SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चोपडाई देवी यात्रेनिमित्त जोतिबा मार्गावर पार्किंगला बंदीकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात अखंड भारताचा सुवर्णकाळ: स्वातंत्र्यदिन आणि आपल्या कर्तव्याची दिशासोमवारी ‘या’ कारणामुळे बालिंगा पंपिंग स्टेशन राहणार बंद!राज्य शासनाच्या विविध योजनांसह महापालिका स्वनिधीतून १६६ कोटी ९३ लाखांची रस्त्यांची कामे सुरूकोल्हापूर महानगर पालिका : बेकायदेशीर नळ कनेक्शन रितसर करण्यासाठी १० दिवसांची मुदत; त्यानंतर दंडात्मक व फौजदारी कारवाईदत्तवाडचे आरोग्यमंदिर लवकरच जनतेच्या सेवेत : आमदार यड्रावकर देवीदास मिसाळ, कृष्णा ठाकरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच येथे अवमान याचिका दाखलनवापूर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय आढावा बैठक खुपिरेच्या बलमीम विकास संस्थेच्या संचालकावर कारवाई करावी अन्यथा आत्मदहन; सामाजिक कार्यकर्ते सरदार बंगे यांचा इशारा

जाहिरात

 

केएमटीच्या ताफ्यात पहिल्या तीन वातानुकूलित ई-बसेस दाखल; लवकरच नियमित सेवेत : सभापती सत्यजित जाधव

schedule30 Jul 26 person by visibility 378 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : कोल्हापूर महापालिकेच्या केएमटीसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला असून, केंद्र शासनाच्या PM e-Bus Sewa योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या अत्याधुनिक वातानुकूलित इलेक्ट्रिक बसपैकी पहिल्या तीन ई-बसेस आज शास्त्रीनगर येथील केएमटी कार्यशाळेत दाखल झाल्या आहेत.

 या बसांच्या आगमनामुळे कोल्हापूरच्या पर्यावरणपूरक, आधुनिक आणि प्रवाशाभिमुख सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. लवकरच या बसेस नियमित प्रवासी सेवेत दाखल होणार असून, यासोबतच शहरातील बसमार्गांचा विस्तार, ग्रामीण भागाशी कनेक्टिव्हिटी, एमआयडीसी परिसरासाठी विशेष मार्ग, तसेच पन्हाळा, जोतिबा आणि आदमापूर (श्री बाळूमामा) यांसारख्या पर्यटन व धार्मिक स्थळांसाठी नवीन बससेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती परिवहन समितीचे सभापती सत्यजित चंद्रकांत जाधव यांनी दिली.

सभापती जाधव म्हणाले की, केंद्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेला ९ मीटर लांबीच्या ५० आणि १२ मीटर लांबीच्या ५० अशा एकूण १०० वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्या आहेत. याचबरोबर ब्रेकडाऊन बसेससाठी पाच जादा बसेस केएमटीला मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यातील तीन बसेस शहरात दाखल झाल्या असून, उर्वरित बसेसही टप्प्याटप्प्याने दाखल होतील. आवश्यक तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना अत्याधुनिक, सुरक्षित, वातानुकूलित आणि प्रदूषणमुक्त बससेवेचा लाभ मिळणार आहे

केंद्र शासनाच्या या प्रकल्पासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला, तर परिवहन समितीचे सभापती म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सत्यजित जाधव यांनी प्रकल्पाला गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्याचेच फलित म्हणून आज पहिल्या बसांचे शहरात आगमन झाले आहे.

सभापती जाधव म्हणाले, केएमटीची सेवा केवळ शहरापुरती मर्यादित न राहता ती सर्वसामान्य नागरिकांच्या गरजेनुसार अधिक व्यापक केली जाणार आहे. शहरातील विद्यमान मार्गांचे पुनर्रचना करून प्रवाशांची संख्या, मागणी आणि वेळेचा अभ्यास केला जाणार असून, ज्या मार्गांवर नागरिकांची मोठी गर्दी असते त्या ठिकाणी बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रतीक्षाकाळ कमी होईल आणि प्रवास अधिक जलद व सुलभ होईल.
यासोबतच कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी नवीन मार्ग सुरू करण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. शहरालगतच्या गावांना केएमटीच्या सेवेशी जोडून विद्यार्थी, कामगार, शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना अधिक सुलभ सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.

औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी शिरोली, गोकुळ शिरगाव आणि कागल एमआयडीसीकडे जाणाऱ्या बसमार्गांचा विस्तार करण्यात येणार असून, कामगार, कर्मचारी आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित नागरिकांना वेळेवर व नियमित बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष नियोजन केले जाणार आहे.
याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन आणि धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठीही केएमटीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ऐतिहासिक पन्हाळा, धार्मिक स्थळ जोतिबा, तसेच आदमापूर येथील श्री बाळूमामा मंदिर अशा प्रमुख पर्यटन व श्रद्धास्थानांसाठी नवीन बसमार्ग सुरू करण्याचा विचार सुरू असून, भाविक आणि पर्यटकांना सुरक्षित, परवडणारी व नियमित सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सभापती जाधव यांनी सांगितले.
सभापती जाधव म्हणाले, केएमटी ही केवळ बससेवा नसून ती कोल्हापूरच्या विकासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. पर्यावरणपूरक ई-बसेस सुरू झाल्यामुळे इंधन खर्चात मोठी बचत होणार असून, कार्बन उत्सर्जन कमी होऊन शहराच्या पर्यावरण संवर्धनालाही मोठी चालना मिळेल. आधुनिक तंत्रज्ञान, वातानुकूलित सुविधा, आरामदायी आसनव्यवस्था आणि सुरक्षित प्रवासामुळे नागरिकांचा सार्वजनिक वाहतुकीवरील विश्वास अधिक दृढ होईल.
"कोल्हापूरकरांना आधुनिक, गतिमान, सुरक्षित, प्रदूषणमुक्त आणि सर्वसमावेशक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देणे हेच आमचे ध्येय आहे. शहरासह ग्रामीण भाग, औद्योगिक क्षेत्रे आणि पर्यटनस्थळांना प्रभावीपणे जोडणारी सक्षम केएमटी सेवा उभारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असा विश्वास परिवहन समितीचे सभापती सत्यजित जाधव यांनी व्यक्त केला.
यावेळी परिवहन समितीचे सदस्य संतोष लाड, वक्स मॅनेजर रणधीर मोरे, अमेय जाधव आदी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes