कोल्हापूर महानगरपालिकेची धडक कारवाई : परवाना न घेता व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या दोन आस्थापना सील
schedule09 Sep 26 person by visibility 146 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा अधिकृत व्यवसाय परवाना न घेता तसेच परवाना विभागाकडे अर्जही दाखल न करता व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या दोन आस्थापनांवर महानगरपालिकेच्या परवाना विभागाने आज धडक कारवाई केली. या कारवाईत ‘टेक्नो स्पोर्ट्स’ आणि ‘आय आय बी क्लासेस’ या दोन आस्थापना सील करण्यात आल्या.
‘टेक्नो स्पोर्ट्स’, एम्पायर टॉवर, ताराबाई पार्क यांना दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी, तर ‘आय आय बी क्लासेस’, रॉयल झिरो नाईन टुरिस्ट अपार्टमेंट, स्टेशन रोड यांना दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी परवाना विभागामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तसेच संबंधित आस्थापनांच्या चालकांना परवाना काढून घेण्याबाबत परवाना विभागाच्या लिपिकांकडून वैयक्तिकरीत्या दोन वेळा सूचना देण्यात आल्या होत्या.
मात्र, महानगरपालिका प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून संबंधितांनी व्यवसाय परवाना घेतला नाही. इतकेच नव्हे, तर परवाना मिळविण्यासाठी किमान अर्जही दाखल केला नाही. त्यामुळे नियमानुसार आज दोन्ही आस्थापनांवर सीलची कारवाई करण्यात आली.
ही कारवाई सहायक आयुक्त डॉ. विजय पाटील, मुख्य अग्निशामक अधिकारी मनीष रणभिसे, अधीक्षक अर्चना प्रभावळे, परवाना लिपिक आकाश मेंडके तसेच इतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
◼️परवाना घेऊनच व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन
कोल्हापूर शहर हद्दीतील सर्व व्यावसायिक व आस्थापनाधारकांनी महानगरपालिकेचा अधिकृत व्यवसाय परवाना प्राप्त केल्यानंतरच व्यवसाय सुरू करावा. परवाना न घेता व्यवसाय सुरू ठेवल्यास संबंधितांवर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.