असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी डॉ. प्रतापसिंह वरूटे यांची बिनविरोध निवड
schedule02 Sep 25 person by visibility 283 categoryशैक्षणिक

▪️डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा
कोल्हापूर : डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक व कोल्हापूर सर्जिकल सोसायटीचे ऍडव्हाजरी मेंबर डॉ. प्रतापसिंह वरूटे यांची असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया (एएसआय) या भारतातील शल्यचिकित्सकांच्या शिखर संघटनेच्या उपाध्यक्ष (वर्ष २०२६) व अध्यक्ष (२०२७) यापदांसाठी बिनविरोध निवड झाली आहे. संघटनेच्या ८६ वर्षाच्या कालखंडात पश्चिम महाराष्ट्रातून उपाध्यक्ष व अध्यक्षपदी बिनविरोध निवडून येणारे ते पहिलेच सर्जन आहेत.
डॉ. वरुटे हे डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या डिपार्टमेंट ऑफ सर्जरीमध्ये कार्यरत आहे. ४४ हजाराहून अधिक सदस्य असलेल्या एएसआयचे सचिव म्हणून २०२२ पासून त्यांनी प्रभावी कामगिरी केली आहे. आता या संघटनेच्या सर्वोच्च पदी काम करण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे.
मागील २० वर्षांमध्ये त्यांनी सर्जरीच्या विविध विषयावरील अनेक परिसंवाद कार्यशाळा, थेट शस्त्रक्रिया प्रक्षेपण कार्यशाळा, वैद्यकीय शिक्षण परिषदामध्ये सहभाग घेतला आहे. उल्लेखनीय म्हणजे अखिल महाराष्ट्र शल्यचिकित्सकांची वार्षिक परिषद २०१६, यासह कोविड काळामध्ये ४० पेक्षा जास्त ऑनलाईन प्लँटफॉर्म वर अखिल भारतीय शल्यचिकित्सकांसाठी कार्यशाळा आयोजित केल्या. याचीच पोचपावती म्हणून डॉ. प्रतापसिंह वरूटे यांची या पदी निवड झाली आहे.
डॉ. प्रतापसिंह वरूटे यांनी महाराष्ट्र सर्जिकल सोसायटीचे २०१७ -१८ या साली अध्यक्षपद भूषवले आहे व असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया (ASI) ते २०२२-२०२४ या सलग तीन वर्षासाठी सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन मागील वर्षी रॉयल कॉलेज ऑफ फिजीशियन अँड सर्जन्स ऑफ ग्लासगो या जगतप्रख्यात युरोपियन कॉलेजने मानद FRCS हि पदवी देऊन सन्मान केला आहे.
डॉ वरुटे यांच्या निवडीबद्दल डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू, डॉ. राकेश शर्मा, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र नेर्ली, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड,सर्जरी विभाग प्रमुख डॉ. रेखा ख्यालाप्पा, उपकुलसचिव संजय जाधव, कोल्हापूर सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मानसिंग आडनाईक, उपाध्यक्ष डॉ. सागर कुरुणकर, सचिव डॉ. अनिकेत पाटील, खजानीस डॉ. सचिन शिंदे व सर्व संचालक मंडळ, अखिल भारतीय, महाराष्ट्र व कोल्हापूर सर्जिकल सोसायटीचे सर्व सभासद तसेच डॉ. आप्पासाहेब मेमोरियल हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. सौ. वसुंधरा वरूटे व सहकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.