कोल्हापुरात गणेशोत्सवात प्रेशर मिड व CO2 गॅस वापरास बंदी; आदेशाचे उल्लंघन झाल्यास फौजदारी कारवाई
schedule30 Aug 25 person by visibility 177 categoryराज्य

कोल्हापूर : भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) मध्ये जेथे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेनुसार कोल्हापूर जिल्हयामध्ये नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव प्रेशर मिड व CO2 गॅस वापरास बंदी आदेश ६ सप्टेंबर २०२५ पर्यंत जारी केला आहे. दिनांक २७ ऑगस्ट २०२५ ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा होत आहे.
जिल्ह्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या मिरवणुकांमध्ये काही मंडळांकडून प्रेशर मिड (Pressure Mid) व CO2 गॅसचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे मिरवणूक बघण्यासाठी जमलेल्या नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण होत आहे.
विशेषतः मानवी श्वसन संस्थेला हानी, हृदय, कान व डोळ्यांवर दुष्परिणाम, सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिरवणुकांमध्ये प्रेशर मिड (Pressure Mid) व CO2 गॅसचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे असे बंदी आदेशात जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.