वि.स. खांडेकर यांचे साहित्य बंदा रुपयाप्रमाणे खणखणीत: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के
schedule02 Sep 25 person by visibility 267 categoryराज्य

* शिवाजी विद्यापीठात ‘नंदादीप’ या ग्रंथाचे प्रकाशन
कोल्हापूर : ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वि.स. खांडेकर यांचे साहित्य आजही बंदा रुपयाप्रमाणे खणखणीत आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातर्फे वि.स. खांडेकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रामधील निवडक व्याख्यानांचे ‘नंदादीप’ या डॉ. रणधीर शिंदे व डॉ. नंदकुमार मोरे संपादित ग्रंथाचे आज कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता, डॉ. सुनीलकुमार लवटे आणि राम देशपांडे प्रमुख उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, खांडेकर यांच्या सुवर्णस्मृती वर्षाचा आरंभ हा या ग्रंथाच्या प्रकाशनाने होतो आहे, याचा आनंद वाटतो. या निमित्ताने पुढील वर्षभरात विद्यापीठाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, यासाठी मराठी विभागाने पुढाकार घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली.
डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी विद्यार्थीदशेपासून आपल्यावर खांडेकर यांच्या पडलेल्या प्रभावाचे विवेचन केले. माझ्या घडण्याचे संपूर्ण श्रेय हे खांडेकरांचेच असून त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठीच त्यांच्या अप्रकाशित साहित्याचे प्रकाशन करण्याचा उपक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. येत्या वर्षभरात खांडेकरांचे ३ प्रस्तावना खंड, २ समीक्षा खंड, २ कादंबऱ्या, १ चरित्रग्रंथ, १ पत्रसंग्रह आणि त्यांनी जपून ठेवलेल्या विविध वर्तमानपत्रांतून त्यांनी खुणा केलेले संदर्भ यांचा ‘रायटर्स एट वर्क’च्या धर्तीवर मागोवा ग्रंथ असे एकूण १० ग्रंथ आपण प्रकाशित करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रकाशक अनिल मेहता यांनी खांडेकरांचे समग्र साहित्य मेहता प्रकाशनामार्फत वाचकांना सादर करण्याचा आगळा आनंद आणि अभिमान वाटत असल्याचे सांगितले. खांडेकर यांचे लेखनिक म्हणून काम पाहिलेल्या राम देशपांडे यांनी खांडेकर हे माणूस म्हणून किती उच्च कोटीचे होते, हे दर्शविणाऱ्या अनेक आठवणी यावेळी सांगितल्या.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. रणधीर शिंदे यांनी केले. कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील, इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ. प्रभंजन माने, डॉ. नीलांबरी जगताप, डॉ. दत्ता मचाले, डॉ. सुखदेव एकल, रवी लोंढे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
प्रकाशन समारंभापूर्वी शिवाजी विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर स्मृती संग्रहालय येथे खांडेकर यांच्या ४९व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, संग्रहालयाच्या संचालक डॉ. नीलांबरी जगताप, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. प्रभंजन माने, डॉ. राजश्री बारवेकर, डॉ. चंद्रकांत लंगरे, डॉ. उदयसिंह राजेयादव आदी उपस्थित होते.