विद्यापीठात फोटोग्राफीचे हँड्स ऑन ट्रेनिंग
schedule14 Sep 25 person by visibility 81 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांना फोटोग्राफीचे हँड्स ऑन ट्रेनिंग देण्यात आले. प्रसिद्ध ट्रेनर सुधीर बोरनाक यांनी उपस्थितांना प्रत्यक्ष कॅमेरा हाताळणीचे धडे दिले.
मोबाईल तंत्रज्ञान विकसित झाले असले तरी कॅमेराचे महत्व बिलकुल कमी झालेले नाही. उलट कॅमेऱ्यामध्ये अनेक नवनवे प्रयोग होत असून फोटोची गुणवत्ता वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक होत आहे. फोटोग्राफीमध्ये उत्तम करिअर असले तरी त्यासाठी सातत्य आणि किमान काही कौशल्ये असणे आवश्यक आहे, असे मत सुधीर बोरनाक यांनी व्यक्त केले.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना कॅमेऱ्याची तपशीलवार माहिती देण्यात आली. कॅमेऱ्यातील तांत्रिक बाबींची सोप्या शब्दात त्यांनी समजावून दिल्या. कॅमेरा हाताळत असताना कोणती दक्षता घ्यावी याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कॅमेरा हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले. मास कम्युनिकेशन विभागासमोर तसेच विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेतले. कॅमेरा हाताळताना येणाऱ्या अडचणीची सोडवणूकही यावेळी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना बोरनाक यांनी उत्तरे दिली.
स्वागत जयप्रकाश पाटील यांनी केले. प्रास्ताविक मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. आभार डॉ. सुमेधा साळुंखे यांनी मानले. कार्यशाळेमध्ये कोल्हापूर, सांगली तसेच सीमा भागातून अनेक जण सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांसोबतच हौशी आणि व्यावसायिक फोटोग्राफरही कार्यशाळेला उपस्थित होते.