जागतिक दर्जाचे स्वयं-अध्ययन साहित्य काळाची गरज : डॉ. मधुकर वावरे
schedule30 Dec 25 person by visibility 51 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : भविष्यात शैक्षणिक क्षेत्रात केवळ ऑनलाइन शिक्षण नव्हे तर ओपन अँड डिस्टन्स मोड (ODL) आणि ऑनलाइन मोड या दोन्ही पद्धतींसाठी दर्जेदार स्वयं-अध्ययन साहित्याची निर्मिती करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाअंतर्गत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) दूरशिक्षण विभागाचे सहसचिव डॉ. मधुकर वावरे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रात पीएम-उषा योजनेअंतर्गत विविध अभ्यासक्रमांचे अभ्यासमंडळ अध्यक्ष व घटक लेखक असणाऱ्या प्राध्यापकांसाठी आयोजित “स्वयं-अध्ययन साहित्य विकास व संपादन” या एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिरडेकर, वाणिज्य अधिविभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन, उपकुलसचिव श्री. विनय शिंदे, विविध अभ्यासमंडळांचे अध्यक्ष व घटक लेखक उपस्थित होते.
डॉ. वावरे पुढे म्हणाले की, स्वयं-अध्ययन साहित्यामध्ये आशय, सुस्पष्टता आणि दर्जा अत्यंत महत्त्वाचा असतो. कोविड-१९ काळात ऑनलाइन शिक्षणाची गरज प्रकर्षाने जाणवली असून, आज भारतात दरवर्षी सुमारे २० लाख विद्यार्थी ऑनलाइन तसेच ओपन अँड डिस्टन्स मोडमधून शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या दोन्ही पद्धतींसाठी उच्च दर्जाचे, संवादात्मक आणि शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध स्वयं-अध्ययन साहित्य उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे.
ते म्हणाले की, तयार होणारे स्वयं-अध्ययन साहित्य केवळ आपल्या विद्यापीठापुरते किंवा भारतापुरते मर्यादित न राहता, जागतिक पातळीवर शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी संदर्भग्रंथासारखे उपयुक्त ठरले पाहिजे. असे साहित्य शिक्षणक्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरावे, तसेच विद्यार्थी, शिक्षक आणि राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठीही सहाय्यभूत ठरावे. त्यामध्ये योग्य उदाहरणे, सुटसुटीत भाषा आणि दर्जेदार मांडणी असली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले की, दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षणाला उज्ज्वल भवितव्य आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे या दोन्ही मोडचे महत्त्व वाढले असून, शिक्षणाचा विस्तार व सर्वसमावेशकता वाढविण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे स्वयं-अध्ययन साहित्याची गुणवत्ता वाढविणे अत्यंत आवश्यक असून, त्यातून राष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाची ओळख निर्माण झाली पाहिजे.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संचालक डॉ. कृष्णा पाटील यांनी केले. श्रीमती सुमन लोहार व श्रीमती प्रियांका सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. चांगदेव बंडगर यांनी आभार मानले.





