SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शक्तीपीठ महामार्ग विरोधी लढा : बांधा ते वर्धा मे अखेरीस संघर्ष यात्रा काढणार : आमदार सतेज पाटीलकोल्हापूर महानगरपालिकेतर्फे एअर रायफल ट्रेनिंगचे 10 मे पासून प्रशिक्षण सुरुडी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात बौद्धिक संपत्ती अधिकार कक्षाची स्थापना; मायक्रेव्ह कन्सल्टंसी समवेत सामंजस्य करारसकारात्मक सुरुवात, सातत्य, संयम ठेवा स्वप्न साध्य होईल : ईशा झंवर; केआयटी प्रचंड उत्साहामध्ये ई-समीट संपन्नकोल्हापूर महापालिकेसमोर खेळणी रचून 'आप'चे आंदोलन; उद्यानातील मोडकी खेळणी बदलण्याची मागणीशक्तीपीठ महामार्गा विरोधातील शेतकऱ्याची आज ऑनलाईन राज्यव्यापी बैठकतेज रोलर स्केटिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यशभारताच्या सैन्यदलाला सलाम ! जयहिंद !!निकालानंतर 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची मोफत सेवाडीकेटीईच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्नीकमध्ये एआयएमएल व मेकॅट्रॉनिक्स पदविका अभ्यासक्रमांना एआयसीटीई, दिल्लीकडून मान्यता; दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांस सुवर्णसंधी

जाहिरात

 

सर्वश्रेष्ठ ज्ञाननिमिर्तीमध्ये युवा पिढीचे योगदान महत्त्वाचे : डॉ. माणिकराव साळुंखे; शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे उद्घाटन

schedule16 Feb 25 person by visibility 398 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : विविधतेमध्ये एकात्मता हे भारताचे वैशिष्ट्य म्हणून पाहिले जाते. या विविधतेमधून सर्वश्रेष्ठ ज्ञानाची निर्मिती व्हावी, यासाठी युवा पिढीचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा पाच विद्यापीठांचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी आज केले.

शिवाजी विद्यापीठात आजपासून राष्ट्रीय एकात्मता साप्ताहिक शिबिरास प्रारंभ झाला. त्यामध्ये महाराष्ट्रासह १२ राज्यांतील २१ विद्यापीठांतील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. पुणे येथील राष्ट्रीय सेवा योजना प्रादेशिक संचालनालय आणि शिवाजी विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या शिबिराच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. साळुंखे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर महाराष्ट्र एन.एस.एस.चे यूथ ऑफिसर सुमंतकुमार यादव आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले, विकसित देशांमध्येही धार्मिकतेसह अनेक प्रकारची विविधता असते. मात्र, त्यांचे प्राधान्य त्यापलिकडे जाऊन विकासाला असते. त्याप्रमाणे आपल्या देशातही विविधतेमधून एकता आणि सहिष्णुतेची भावना निर्माण व्हावी आणि त्यातून ज्ञानाधिष्ठित समाजाची निर्मिती व्हावी. यासाठी तरुणांना मोठे योगदान देण्याची संधी आहे. विकसित भारताची संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी देशातील सर्व सामाजिक-आर्थिक घटकांचा सर्वसमावेशक विकास होणे अत्यावश्यक आहे. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांनी अशा प्रकारच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी पावले उचलली. त्या कार्याच्या पाऊलखुणा आजही या भूमीवर पाहावयास मिळतात. देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांनी दसरा चौकामधील वसतिगृहांच्या रुपाने राजर्षी शाहू महाराजांची सजीव स्मारके आवर्जून पाहावीत, असे त्यांनी सांगितले. तरुणांनी लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा योग्य वेळीच लाभ उठविण्यासाठी कार्यरत झाले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, राष्ट्रीय एकात्मता शिबिराच्या निमित्ताने देशभरातून एकत्र आलेल्या तरुणांनी एकमेकांशी संवाद साधावा, एकमेकांच्या भाषा, संस्कृती जाणून त्यांचा आदर करण्याची भावना विकसित करावी. आपले कुटुंब, आपला समाज आणि आपला देश यांच्याप्रती निस्वार्थ भावनेने सेवा देण्याचा निश्चय करावा. हेच या शिबिराचे फलित असेल. शिवाजी विद्यापीठाचा परिसरही अतिशय वैविध्यपूर्ण आहे. हा परिसरही आपल्याला खूप गोष्टी शिकवेल. त्याचाही आनंद घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

सुमंतकुमार यादव यांनी देशात ४० लाख आणि महाराष्ट्र-गोव्यात चार लाख एनएसएस स्वयंसेवक कार्यरत असून ते सामाजिक विकासामध्ये योगदान देत असल्याचे सांगितले. येत्या शिवजयंतीच्या निमित्ताने राज्यात सर्वत्र पदयात्रा काढण्यात येणार असून ‘जय शिवाजी, जय भारत’ असे त्याचे घोषवाक्य असल्याचे सांगितले. या पदयात्रेत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी राष्ट्रीय एकात्मता शिबिराच्या माध्यमातून स्वयंसेवकांना त्यांचे सुप्त ण प्रदर्शित करण्याची, नेतृत्वविकास क्षमता विकसित करण्याची आणि अंतिमतः आजीवन अध्ययनाच्या प्रक्रिया जवळून समजून घेण्याची संधी लाभत असल्याचे सांगितले. सामाजिक-धार्मिक सौहार्दासह देशभक्तीच्या धाग्याने सहभागी शिबिरार्थी आजीवन जोडले जातील, अशी अशा त्यांनी व्यक्त केली.

मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी घालून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रम अधिकारी प्रमोद पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. उमाजी पाटील यांनी आभार मानले.

▪️पारंपरिक वेशभूषा संचलनाने उत्साही प्रारंभ
शिवाजी विद्यापीठात आजपासून २२ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरामध्ये महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, केरळ, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि गोवा या राज्यांतील २१ विद्यापीठांचे २१० स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले आहेत. आज सायंकाळी आपापल्या राज्यांच्या पारंपरिक वेशभूषेसह सारे स्वयंसेवक विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनासमोर एकत्रित आले. त्यांनी ढोल, ताशा आणि झांजपथकाच्या साथीने आपापल्या राज्यांच्या पारंपरिक लोकनृत्य व परंपरांचे दर्शन घडवित संचलन केले. मान्यवरांनीही या संचलनामध्ये सहभाग दर्शविला. सर्व सहभागींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करीत फेरी मारली. येथून पुढेही सात दिवस या विविधतेतून एकतेचे दर्शन कशा प्रकारे घडणार आहे, याची झलकच जणू या शिबिरार्थींनी आज उपस्थितांना दाखवून दिली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes