कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघात क्रांतिज्योती सावित्रीबाईंचा जन्मदिन ग्रंथदान उपक्रमाने साजरा
schedule04 Jan 25 person by visibility 412 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाने सावित्रीबाई फुलेंच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ग्रंथदान उपक्रमाचे आयोजन करून खऱ्या अर्थाने राजर्षी शाहूमहाराजांचा शैक्षणिक व वैचारिक वारसा जपला. कोल्हापूर शहर व उपनगरातील सत्तावीस हायस्कूल्सना प्राचार्य जीवन साळोखे यांनी आपल्या ग्रंथदान उपक्रमांतर्गत सहाशे वाचनीय पुस्तके भेट देवून आदर्शवत कार्य केले आहे. असे गौरवोद्गार राजर्षी शाहूमहाराजांचे चरित्रकार ज्येष्ठ संशोधक प्राचार्य डाॅ. जे के पवार यानी काढले.
ते कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाने आयोजित जीवन साळोखे यांच्या ग्रंथदान उपक्रमांतर्गत ग्रंथभेट कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक, स्तंभलेखक प्रा.दिनेश डांगे, ज्येष्ठ पत्रकार मोहन हवालदार, प्रसिद्ध प्रकाशक अभिनंदन चे त्रिभुवननाथ जोशी, माजी प्राचार्य माळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. मुख्याध्यापक संघाचे सचिव आर. वाय. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक करून प्राचार्य जीवन साळोखे यांच्या गेल्या दोन दशकांतील सुरू असलेल्या ग्रंथदान उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल, पुस्तक व गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी कोल्हापूर शहर व उपनगरातील सत्तावीस हायस्कूल्स व ज्युनियर काॅलेजीसच्या ग्रंथालयांना जीवन साळोखे यांनी "समृद्ध शालेय ग्रंथालय" या उपक्रमांतर्गत सहाशेहून अधिक पुस्तके, आण्णाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्यांचे खंड, ग्रंथालय शास्त्राचे जनक डाॅ.एस.आर.रंगनाथन यांची व ग्रंथालयाची पंचसुत्री ची लॅमिनेटेड प्रतिमाही भेट दिली.
यावेळी प्राचार्य जीवन साळोखे यांनी सध्याच्या काळात, वाचनाचे महत्त्व सविस्तर विशद करून ते म्हणाले, "तरुणाईमध्ये सभ्य भाषा, संस्कार आणि मराठीची भाषिक कौशल्ये नव्याने रुजवण्यासाठी आणि वाचन प्रोत्साहनासाठी ग्रंथदान उपक्रम शाळाशाळांतून प्रत्यक्षात राबविण्यात आला पाहिजे. पुस्तकावर छापलेली किंमत ही त्याची खरी किंमत नसून ते पुस्तक न वाचल्याने आपल्याला चुकवावी लागणारी किंमत ही त्या पुस्तकाची खरी किंमत आहे. वाचनसंस्कृतीच्या समृद्धीवरच भविष्यात शाळांचे अस्तित्व टिकणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी प्रा. दिनेश डांगे, पत्रकार मोहन हवालदार यांनी आपल्या भाषणात वाचनसंस्कृती आणि ग्रंथदान उपक्रमाचे महत्त्व विशद करून मुख्याध्यापक संघाने ही ग्रंथदान चळवळ नेटाने संपूर्ण जिल्ह्य़ात राबवण्याचे आवाहन केले.
प्रा. सुषमा पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक गणेश चव्हाण यांनी समारोप केला. या कार्यक्रमास शहरातील हायस्कूल्सचे मुख्याध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.