SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठ आणि "सिद्धांता नॉलेज फाउंडेशनची संयुक्त बैठकविभागांनी 100 दिवसांच्या आराखड्यातून ठोस कामगिरी करावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; पुढील 100 दिवसांच्या नियोजनाचा घेतला आढावाराज्यात १ एप्रिल पासून टोलनाक्यांवर फास्ट-टॅगद्वारेच पथकर भरावा लागणार‘एचएमपीव्ही’ विषाणूसंदर्भात नागरिकांनी भीती बाळगू नये; काळजी घ्यावी : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ; सर्व अधिष्ठातांनी सतर्क राहण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचे निर्देशशिवाजी विदयापीठाचे पहिले नेटबॉल महिला संघ अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेसाठी रवानाकोल्हापूर : प्रधानमंत्री आवास योजनेच्या नविन घरकुल योजनेची मंजुरी सुरुसावकर चषक २०२५ चा मानकरी ठरला दख्खन पन्हाळा; कै.दिलीप जोशी यांच्या स्मरणार्थ भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजनकोल्हापूर महापालिकेतर्फे कोल्हापूर शहर सुधारणा समितीच्या आंदोलनाची दखल घेऊन अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखलउर्दू कार्निवल 2025 चे 11 जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर आयोजन : गणी आजरेकरडॉ.बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये ग्रंथ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जाहिरात

 

माध्यमांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अपरिहार्य: सम्राट फडणीस; राज्यातील नऊ विद्यापीठांच्या पत्रकारिता विभागांद्वारे राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यान

schedule06 Jan 25 person by visibility 287 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : माध्यमांतील तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. या तंत्रज्ञानापासून दूर राहता येणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे तंत्रज्ञानाच्या विस्ताराचा वेग आणखी वाढला असल्याने त्याला वगळून पत्रकारिता करता येणार नाही. ही कृत्रिम बुद्धिमत्ता संकट नसून माध्यमांसाठी अपरिहार्य तंत्रज्ञान आहे, असे मत दैनिक सकाळच्या पुणे आवृत्तीचे संपादक सम्राट फडणीस यांनी आज व्यक्त केले.

मराठी पत्रकार दिनानिमित्त राज्यातील नऊ विद्यापीठांतील पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागांच्या संयुक्त विद्यमाने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माध्यमे’ या विषयावर श्री. फडणीस यांचे विशेष ऑनलाईन व्याख्यान झाले.

सम्राट फडणीस म्हणाले, मुद्रित माध्यमांच्या प्रारंभीच्या काळात तंत्रज्ञानाच्या वाढीचा वेग कमी होता. इंटरनेट आल्यानंतर तंत्रज्ञानाच्या विस्ताराची गती वाढली. गेल्या दहा वर्षात हे तंत्रज्ञान अतिशय झपाट्याने विस्तारले असून माध्यमांचे अंतरंग त्यामुळे बदलून गेले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आगमनानंतर माध्यमांवर खूप मोठा परिणाम होत आहे. इंग्रजी माध्यमात सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर प्रभावीपणे केला जात आहे. भाषिक पत्रकारितेत अनेक नवे प्रयोग सुरू असून येत्या पाच वर्षांत भाषिक पत्रकारिता कृत्रिम बुद्धिमत्तेने व्यापली जाणार आहे. पत्रकारितेतील बातमीदारी जरी कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे करता येणे लगेच शक्य नसले तरी बातमी लेखन, भाषांतर, संहिता लेखन, निवेदन, लेख आदी क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्ता अतिशय अचूकपणे काम करेल. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगची माध्यम क्षेत्रात अगामी काळात प्रचंड गरज भासणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेला नेमके प्रश्न विचारण्याची क्षमता पत्रकारांना विकसित करावी लागणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेतून आलेल्या उत्तरांची शहानिशा करण्याचे कौशल्यही पत्रकारांना अंगिकारावे लागणार आहे.

फडणीस म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकर्‍या जातील किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता कामे हिरावून घेईल, ही भीती अनाठायी आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेक नव्या नोकर्‍याही तयार होणार आहेत. माध्यम व्यवसायात सुरुवातीपासून तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. तंत्रज्ञानाशिवाय माध्यमांत व्यवसाय होऊ शकत नाही. व्यावसाय वाढवायचा असेल तर कृत्रिम बुद्धिमत्तेला स्वीकारण्याशिवाय माध्यमांकडे पर्याय उरत नाही. पत्रकारांनीही आपली उत्सुकता आणि सजगता जागृत ठेऊन नव्या तांत्रिक गोष्टी शिकून घेणे बदलत्या काळात आवश्यक आहे.

यावेळी ‘थिंक बँक’चे संस्थापक विनायक पाचलग यांनीही मार्गदर्शन केले. ते म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता आता सर्वसामान्यांच्या हातात पोहोचली आहे. समाजात प्रत्येकजण आशय निर्माता आणि वितरक झाला आहे. माध्यमात आशय खूप महत्त्वाचा मानला जातो; परंतु बदलत्या स्थितीत वितरणाला त्याहून अधिक महत्त्व आले आहे. नव्या तंत्रज्ञानामध्ये अल्गोरिदमची भूमिका निर्णायक राहिली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अलिकडे आली असली तरी गेल्या दहा वर्षापासून अल्गोरिदमद्वारे समाजात अनेक बदल घडून आले आहेत. माध्यमांच्या ग्राहकांची मानसिकताही बदलली आहे. एकाच कुटुंबात अल्गोरिदममुळे अनेक प्रवाह आहेत. आता कृत्रिम बुद्धिमत्तेची त्यात भर पडली असून येणारा काळ आव्हानात्मक असेल. केवळ उत्तम आशय निर्माण करून चालणार नाही, तर तो नेमक्या ग्राहकांपर्यंत पोहोचवता आला पाहिजे. यासाठी वितरणाचे तंत्र आणि कौशल्य समजून घ्यावे लागणार आहे. प्रत्येक माध्यमाचे नेमके प्रयोजन काय आहे, हेही एकदा तपासून पहावे लागणार आहे. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि वेब माध्यमांच्या स्वतःच्या काही गरजा आणि त्यांच्या ग्राहकांच्या काही अपेक्षा आहेत, हेही नीट समजून घ्यावे लागेल. या सर्वच माध्यमांनी परस्परांशी जुळवून घेणे त्यांच्या हिताचे आहे. आशयाची निर्मिती बेसुमार होत आहेत. अशा वेळी योग्य आणि अयोग्य हे ओळखणार्‍या पत्रकारांची भूमिका सर्वात महत्वाची ठरणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत असताना विश्वासार्हता टिकवणे आणि वाढवणे सर्वात मोठे आव्हान आहे.

प्रारंभी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व पत्रकारिता विभागाचे माजी प्रमुख डॉ. किरण ठाकूर यांना आदरांजली वाहण्यात आली. पुण्याचे विभागप्रमुख डॉ. संजय तांबट यांनी डॉ. ठाकूर यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला.

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागाच्या प्रमुख डॉ. निशा मुडे-पवार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रभारी प्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर, छ. संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. दिनकर माने, मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. सुंदर राजदीप, संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. मोईज हक, मुंबई येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाच्या प्रमुख डॉ. मीरा देसाई, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र गोणारकर आदींनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर भटकर यांनी केले. डॉ. गोपी सोरडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शिवाजी जाधव यांनी आभार मानले. ऑनलाईन व्याख्यानाला विविध विद्यापीठांच्या पत्रकारिता विभागातील शिक्षक, संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes