केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून ‘वंदे मातरम् सायक्लोथॉन २०२६’ चे आयोजन
schedule08 Feb 26 person by visibility 132 categoryराज्य
मुंबई : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला (सीआयएसएफ) कडून आपल्या 27 वर्षाची गौरवशाली सेवेचे औचित्य आणि ‘वंदे मातरम्’ गीताच्या 150 वर्षांच्या गौरवार्थ ‘वंदे मातरम्’ सुरक्षित तटम् समृद्ध भारतम्’ सायक्लोथॉन 2026 उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत सीआयएसएफची 65 सायकलपटूंचे चमू 10 ते 14 फेब्रुवारी 2026 दरम्यान राज्यात किनारी मार्गाने प्रवास करणार आहेत. हे चमू राज्यात 10 फेब्रुवारी 2026 रोजी जुचंद्र (ता. वसई, जि. पालघर) येथे प्रवेश करणार आहेत.
या उपक्रमाद्वारे भारताच्या नऊ किनारी राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशातील किनारपट्टीवर प्रवास करून किनारी प्रदेशातील समुदायांना अमली पदार्थ वाहतूक, शस्त्रे व स्फोटकांच्या तस्करीसारख्या धोक्यांबद्दल जागरूक करण्यात येणार आहे. तसेच मजबूत किनारी सुरक्षेसाठी सुरक्षा यंत्रणातील सहभाग, भारताचा समृद्ध वारसा, पंरपरा व इतिहास याविषयी जनजागृती निर्माण करण्यात येणार आहे.
सायकलपटूंच्या पथकाला 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दु. 1 वाजेदरम्यान तारापूर सीआयएसएफ युनीटकडून हिरवी झेंडी दाखविणे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच जुचंद्र गावातील चंडीका देवी मंदीरात पथकाचा मुक्काम असणार आहे. पथकाचे 11 फेब्रुवारी रोजी गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथे आगमन होणार असून सकाळी 8.30 ते 10 वा. दरम्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच कुरूळ (ता. अलिबाग, जि. रायगड) रात्रीचा मुक्काम राहणार असून 12 फेब्रुवारी रोजी कुरूळ गावातच ग्रामस्थांसोबत क्रिकेट, व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा होणार आहे. तसेच सायं 5 वाजता जिल्हा परिषदेच्या मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.
या उपक्रमाअंतर्गत 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.45 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे जि. रायगड येथे पथकाला हिरवी झेंडी दाखविणे व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तसेच अंजनवेल (जि. रत्नागिरी) गावात मुक्काम असणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील अंतिम प्रवासात 14 फेब्रुवारी रोजी रत्नागिरी येथील पोलीस मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करुन पुरळ (ता. देवगड जि. सिंधुदुर्ग) या ठिकाणी रात्रीचा मुक्काम असणार आहे. त्यानंतर सायकलपटूंचे पथक पुढील प्रवासासाठी गोवा राज्यात जाणार आहे.