कोल्हापुरात स्थानिक गुन्हे शाखेकडून दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; १२ मोटार सायकलींसह ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
schedule07 Apr 26 person by visibility 133 categoryगुन्हे
कोल्हापूर : जिल्ह्यात सातत्याने होणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) धडाकेबाज कारवाई करत तीन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण १२ मोटार सायकली जप्त केल्या असून, तब्बल ५ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या यशस्वी मोहिमेमुळे ९ गुन्हे उघडकीस आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, रेकॉर्डवरील गुन्हेगार दर्शन जाधव हा त्याच्या साथीदारासह चोरीच्या गाड्या विक्री करण्यासाठी फुलेवाडी रिंग रोड परिसरात येणार होता. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून दर्शन रमेश जाधव (२६) आणि फारुक फिरोज शेख (१९) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या विना नंबर प्लेटच्या गाड्यांची तपासणी केली असता, त्या जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी अधिक गुन्ह्यांची कबुली दिली. तपासादरम्यान त्यांचा तिसरा साथीदार प्रतीक विलास पाटील यालाही ताब्यात घेण्यात आले. जप्त केलेल्या गाड्यांमध्ये यामाहा, ॲक्सेस, स्प्लेंडर, केटीएम ड्युक आणि वेस्पा मोपेड अशा महागड्या गाड्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, आरोपी एका टीव्हीएस कंपनीच्या गाडीवर यामाहाचा बनावट लोगो लावून ती चोरीसाठी वापरत असत. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई आणि शहर विभाग उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पुढील तपासासाठी आरोपींना जुना राजवाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.