बळीराजा पाणंद रस्त्यांसाठी ३० दिवसांत पाहणी व प्रस्ताव सादर करा; आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे निर्देश
schedule07 Apr 26 person by visibility 142 categoryराज्य
जयसिंगपूर : बळीराजा पानंद रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून, शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावातील किमान एक पाणंद रस्ता येत्या ३० दिवसांत पाहणी करून त्याचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवावेत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. १५ तारखेपर्यंत प्राथमिक पाहणी पूर्ण करून ५ मेपर्यंत सर्व प्रस्ताव सादर करावेत, जेणेकरून निधी मंजुरीची प्रक्रिया गतीमान होईल, असेही त्यांनी सांगितले.
बळीराजा पानंद रस्त्याच्या विषयावर जयसिंगपूर येथील स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर नाट्यगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी आमदार यड्रावकर बोलत होते.
या बैठकीत पानंद रस्त्यांच्या कामासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. नमुना १-फ (Form 1-F) अंतर्गत रस्त्यांचे प्रस्ताव तयार करून ते भूमि अभिलेख विभागाकडे सादर करण्यात येणार आहेत. त्यानंतर सिमांकन प्रक्रिया पूर्ण करून संबंधित रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
तलाठी आणि ग्रामसेवक यांना गावनिहाय सर्व पानंद रस्त्यांची पाहणी करून अचूक नोंदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या नोंदींच्या आधारे प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव तयार केले जाणार आहेत. शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचण्यासाठी सुलभ रस्ते उपलब्ध व्हावेत, हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
दरम्यान, बळीराजा पानंद रस्त्याबाबत राज्य शासनाने नव्याने जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार (जीआर) रस्त्यांच्या मंजुरीसाठी प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. सिमांकन, नकाशे, प्रत्यक्ष पाहणी आणि स्थानिक अहवाल यांना अधिक महत्त्व देण्यात आले असून, निधी वितरणातही गती आणण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे अपूर्ण राहिलेल्या पानंद रस्त्यांना लवकर मंजुरी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आमदार यड्रावकर यांनी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून वेळेत प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश दिले. या उपक्रमामुळे शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून शेतीसाठी आवश्यक दळणवळण सुधारण्यास मदत होणार आहे.
या प्रसंगी प्रांताधिकारी दीपक शिंदे, प्रभारी तहसीलदार क्रांती पाटील, शिरोळ पंचायत समितीचे बीडिओ विजय परीट,तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत जांगळे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अनंत सूर्यवंशी,बांधकाम समितीचे उप अभियंता प्रदीप हुपरे,जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, प्रचीता कोळी प्रशांत शहापुरे, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे, उपसभापती सौ.मनीषा कदम, पंचायत समिती सदस्य प्रतिक उर्फ बंटी पाटील, अविनाश पाटील, दीप्ती जाधव, फजलेअली पटेल, प्रवीण देसाई, सीमा म्हैशाळे, नाना उपाध्ये, बाबासो वनकोरे, समितीचे सदस्य नंदकुमार पाटील,बाळासाहेब नाईक धनाजी भोसले,आनंदा कुमे आदी मान्यवर उपस्थीत होते.