मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत महामोर्चा; कोल्हापुरातून १५ हजार बांधव होणार सहभागी
schedule26 Sep 26 person by visibility 188 categoryसामाजिक
कोल्हापूर : मातंग समाजाच्या अ, ब, क, ड उपवर्गीकरण आरक्षणाच्या मागणीसाठी आणि शासनाच्या दिरंगाईविरोधात सकल मातंग समाज, कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने आगामी २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर एका भव्य 'महामोर्चा'चे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक मोर्चामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून १५ ते २० लाख मातंग बांधव सहभागी होणार असून, यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे १२ ते १५ हजार समाजबांधव गाड्या, बस आणि रेल्वेने मुंबईकडे कूच करणार आहेत.
सकल मातंग समाज, कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, मातंग समाज गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून आपल्या स्वाभिमान, सामाजिक न्याय आणि आरक्षणासाठी संघर्ष करत आहे. गत १ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा ऐतिहासिक निकाल देत मातंग समाजाला अ, ब, क, ड उपवर्गीकरणानुसार स्वतंत्र आरक्षण लागू करण्याचे स्पष्ट आदेश महाराष्ट्र सरकारला दिले होते. देशातील इतर ६ राज्यांमध्ये मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षणाचा लाभ मिळत असताना, महाराष्ट्र शासन मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप समाजाने केला आहे.
◼️मुख्य मागण्या :
▪️ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी: १ ऑगस्ट २०२४ च्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात अनुसूचित जातीचे (SC) अ, ब, क, ड उपवर्गीकरण करून मातंग समाजाचे स्वतंत्र आरक्षण त्वरित लागू करावे.
▪️ इतर राज्यांचा दाखला: देशातील इतर ६ राज्यांत मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षणाचा लाभ मिळत असताना महाराष्ट्रातील मातंग समाजावरच अन्याय का केला जात आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
▪️ कोल्हापूर जिल्ह्याचा पूर्ण पाठिंबा: या महामोर्चामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणावर समाजबांधव सहभागी होणार आहेत.
▪️ राज्य सरकारला इशारा: सरकारने तातडीने विशेष अधिवेशन किंवा अध्यादेश (Ordinance) काढून आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अन्यथा होणाऱ्या तीव्र जनआंदोलनाudया संपूर्ण जबाबदारी सरकारची राहील, असा स्पष्ट इशारा सकल मातंग समाज समन्वयक बाजीराव नाईक यांनी दिला आहे.
गेल्या चार दशकांपासून समाजाने अनेक मोर्चे आणि आंदोलने केली असून, आता हा लढा अंतिम टप्प्यात असल्यामुळे आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून परतणार नाही, अशी आक्रमक भूमिका समाजबांधवांनी घेतली आहे.