कोल्हापूरचा पर्यावरणस्नेही विक्रम! इराणी खणात तब्बल २,९१९ गणेशमूर्तींचे विसर्जन; प्रशासनाची २५ तासांहून अधिक अविरत सेवा
schedule26 Sep 26 person by visibility 191 categoryमहानगरपालिका
◼️पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
◼️महापालिकेची यंत्रणा २५ तासांहून अधिक काळ कार्यरत
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन घरगुती नागरिक तसेच सार्वजनिक गणेश मंडळांना महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गणेश विसर्जनासाठी शहरातील विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडांचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वापर केला.
सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान स्वयंचलित विसर्जन यंत्रणेद्वारे तसेच चारही विभागीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील कृत्रिम विसर्जन कुंडांमध्ये व थेट इराणी खणीमध्ये घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या १,२८२ लहान गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
तसेच महापालिकेला अर्पण करण्यात आलेल्या व इराणी खण येथे सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जित केलेल्या १,६३७ मोठ्या गणेशमूर्ती आणि १,२८२ लहान गणेशमूर्ती अशा एकूण २,९१९ गणेशमूर्तींचे इराणी खणीमध्ये पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले.
महापालिकेच्या गणेशमूर्ती अर्पण करण्याच्या आवाहनाला शहरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत गणेशमूर्ती अर्पण केल्या. तसेच सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक नियोजनबद्ध, शिस्तबद्ध व शांततेत पार पाडल्याबद्दल महापौर रूपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी व प्रतिनिधींचे आभार मानले.
गणेश विसर्जनाचे संपूर्ण कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी, आरोग्य, पवडी, सफाई, विद्युत, वर्कशॉप विभाग, अग्निशमन दलाचे जवान, वैद्यकीय पथके, हमाल, क्रेन चालक तसेच विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनी सलग दिवस-रात्र विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या योगदानाबद्दलही महापौर व आयुक्तांनी मनापासून आभार व्यक्त केले.
◼️साई मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीची पहाटे ३ वाजता आरती
पापाची तिकटी येथे विक्रमनगर येथील साई मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीची अंतिम आरती रात्री ३ वाजता पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच मिरवणूक मार्गावरून येणाऱ्या शेवटच्या राजश्री शाहू फ्रेंड सर्कल प्रतिभानगर या मंडळाची गणेशमूर्ती इराणी खण येथे सकाळी ९ वाजता विसर्जनासाठी दाखल झाल्यानंतर त्यांचीही आरती करण्यात आली. यावेळी महापालिका व पोलीस विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
◼️पापाची तिकटी व निर्माण चौक येथे मंडळांचे स्वागत
अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या सार्वजनिक संस्था, तरुण मंडळे व तालीम संस्थांच्या अध्यक्षांचे पापाची तिकटी येथील स्वागत मंडपात महापौर रूपाराणी निकम, आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, पदाधिकारी व अधिकारी यांच्या हस्ते श्रीफळ, पान-सुपारी व रोप देऊन स्वागत करण्यात आले.
पापाची तिकटी येथील स्वागत मंडपात ३१० गणेश मंडळांची नोंद झाली, तर निर्माण चौक येथील पर्यायी मिरवणूक मार्गावरील महापालिकेच्या स्वागत मंडपात ३०४ गणेश मंडळांची नोंद झाली.
◼️महापालिकेची यंत्रणा २५ तासांहून अधिक काळ कार्यरत
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची संपूर्ण यंत्रणा विसर्जनस्थळे व मिरवणूक मार्गावर २५ तासांहून अधिक काळ कार्यरत होती. विसर्जनापूर्वी मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची डागडुजी, अतिक्रमणे व इतर अडथळे हटविण्यात आले होते. विसर्जन मार्गावर लाकडी, मजबूत बांबू तसेच आवश्यकतेनुसार लोखंडी बॅरिकेड्स आणि वॉच टॉवर उभारण्यात आले होते.
इराणी खण येथे मोठ्या एलईडी स्क्रीनद्वारे प्रकाशव्यवस्था करण्यात आली होती. खणीच्या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेडिंग, वॉच टॉवर व पोलीस पेंडल उभारण्यात आले होते. इराणी खण तसेच मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते.
आरोग्य विभागाच्या पथकांकडून विसर्जनस्थळी तातडीने स्वच्छता करण्यात येत होती. मिरवणूक मार्ग तसेच इराणी खण येथील विसर्जनस्थळी वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली होती. अग्निशमन विभागामार्फत अग्निशमन दलाचे दक्षता पथक, सुरक्षा रक्षक व आवश्यक साधनसामग्रीसह व्यवस्था करण्यात आली होती.
सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी इराणी खण येथे ४ क्रेन व १० फ्लोटिंग तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. विसर्जनाच्या कामकाजासाठी पवडी, आरोग्य, उद्यान, उपद्रव शोध पथक तसेच अन्य विभागांतील सुमारे ३ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
यासोबतच १०० टेंपो, ४०० हमाल, ५ जेसीबी, ७ डंपर, ४ पाणी टँकर, २ बूम व ६ ॲम्ब्युलन्स यांसह आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. गणेशमूर्ती व निर्माल्य संकलित करून ते इराणी खण येथे पोहोचविण्यासाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती.
◼️३५ टन निर्माल्याचे संकलन
विसर्जनादरम्यान धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सुमारे ६०० सेवकांच्या माध्यमातून ३५ मेट्रिक टन निर्माल्याचे संकलन करण्यात आले. यासाठी १० डंपरची व्यवस्था करण्यात आली होती. संकलित निर्माल्य खतनिर्मिती प्रक्रियेसाठी पाठविण्यात आले.
◼️महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विशेष परिश्रमामुळे विसर्जन यशस्वी
इराणी खण व पापाची तिकटी येथे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या उपस्थितीत अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, उपआयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनावडे, नागेंद्र मुतकेक, सहायक आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, संजय सरनाईक, डॉ. विजय पाटील, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता रमेश मस्कर, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, उपशहर रचनाकार महादेव फुलारी, पदमल पाटील, नगरसचिव दिवाकर कारंडे, उपशहर अभियंता सुरेश पाटील, निवास पोवार, अरुण गवळी, मिलिंद जाधव, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, वर्कशॉप प्रमुख संजय भोसले, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग राजपूत, जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्राबरे, सहायक विद्युत अभियंता नारायण पुजारी, अमित दळवी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी २५ तासांहून अधिक काळ अथक परिश्रम घेत पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची संपूर्ण प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.
◼️विसर्जन मार्गावरून 1 डंपर चपलांचा ढीग व कचऱ्याचा उठाव
सार्वजनिक गणेश मिरवणूक संपल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत मुख्य मिरवणूक मार्ग व रंकाळा परिसरातील स्वच्छता तातडीने हाती घेण्यात आली. बिंदू चौक, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, खरी कॉर्नर, गंगावेश, रंकाळा वेश, रंकाळा टॉवर, जुना वाशी नाका ते इराणी खण या मुख्य मार्गावरून सुमारे एक डंपरपेक्षा अधिक चपलांचा ढीग व इतर कचऱ्याचा युद्धपातळीवर उठाव करण्यात आला.
तसेच कसबा बावडा येथील राजाराम बंधारा परिसरातील घाटाचीही रात्री २ वाजताच स्वच्छता करण्यात आली.
कोल्हापूरकर नागरिक, सार्वजनिक गणेश मंडळे, विविध सेवाभावी संस्था, पोलीस प्रशासन तसेच महापालिकेच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून यंदाचा सार्वजनिक गणेश विसर्जन सोहळा शांततेत, शिस्तबद्ध व पर्यावरणपूरक पद्धतीने यशस्वीपणे पार पडला.