बस्तवाड येथील आरोग्य शिबिरात ४१८ नागरिकांची तपासणी
schedule31 Oct 26 person by visibility 127 categoryआरोग्य
◼️मोफत आरोग्य अभियानातील लाभार्थ्यांची संख्या १३ हजार ७१३ वर
बस्तवाड : सहकारमहर्षी स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिरोळ तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या मोफत आरोग्य व नेत्र तपासणी अभियानांतर्गत बस्तवाड येथे आयोजित आरोग्य शिबिरात ४१८ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामुळे अभियानातील आजअखेरच्या एकूण लाभार्थ्यांची संख्या १३ हजार ७१३ वर पोहोचली आहे.
आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन आणि शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, यड्राव यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, विविध आजारांचे वेळेत निदान करणे आणि आरोग्याविषयी जनजागृती करणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
बस्तवाड येथील शिबिरात १९५ नागरिकांची नेत्र तपासणी, १८८ नागरिकांची आरोग्य तपासणी, तर ३५ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यापूर्वी अभियानांतर्गत १३ हजार २९५ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला होता. बस्तवाड येथील ४१८ लाभार्थ्यांची भर पडल्याने एकूण लाभार्थ्यांची संख्या आता १३ हजार ७१३ झाली आहे.
या प्रसंगी सुरेंद्र जंगम, सुभाष चौगुले, सुरेश ऐवळे, सुनीता चौगुले, अलका मोरे, कल्पना ऐवळे, प्रदीप चौगुले यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.