आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून 72 क्षयरुग्णाना पोषण आहार किट
schedule19 Sep 24 person by visibility 324 categoryआरोग्य
कोल्हापूर : प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियानातर्गत कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी डी.वाय.पाटील ग्रुपच्या माध्यमातून 72 क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप केले.
आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजनेअंतर्गत 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारताचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उद्दीष्ट्यपूर्तीसाठी राष्ट्रपतींनी 9 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत संस्था, उद्योग समुह, व्यक्ती, यांनी क्षयरुग्णांना किमान सहा महिन्यासाठी पोषण आहार किट देऊन 'निक्षय मित्र' बनण्याचे आवाहन करण्यात आले होते.
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. माधव ठाकूर व करवीर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उत्तम मदने यांच्याकडून केलेल्या आवाहनानुसार डी.वाय.पाटील ग्रुपच्या माध्यमातून आमदार श्री ऋतुराज पाटील यांनी 72 क्षयरुग्णांसाठी पोषण आहार किट उपलब्ध करून दिले आहे. आमदार पाटील यांच्या हस्ते व आरोग्य अधिकाऱ्यांच्या उपस्थित क्षयरुग्णांना हे कीट प्रदान करण्यात आले.
टी.बी च्या उपचार कालावधीत योग्य पोषण आहार मिळाला नाही तर सकारात्मक परिणाम दिसत नाही. पूर्ण औषधोपचारामुळे व योग्य पोषण आहार यामुळे टी.बी. पूर्णपणे बरा होतो, अशी माहिती आरोग्य विभाग अधिकाऱ्यानी दिली.
यावेळी जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परवेज पटेल, करवीर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उत्तम मदने श्रीम. दिया कोरे, धनंजय परीट, डी. डी. पाटील, श्री. एकनाथ पाटील, डी. डी. पाटील आदी उपस्थित होते.