कसबा बावडा : डी. वाय. पाटील हॉस्पीटल कदमवाडी येथे नेत्ररोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. कॉर्निया कन्सल्टंट डॉ. सुप्रिया सुयोधन घोरपडे यांनी ही शस्त्रक्रिया करून शाहुवाडी तालुक्यातील ६२ वर्षीय प्रौढाला नवी दृष्टी दिली आहे.
शाहुवाडी येथील सबंधित रुग्णाला सुमारे दीड वर्षापूर्वी शेतात काम करत असताना उसाचे पाते डोळ्याला लागून जखम झाली होती. त्यामुळे फंगल अल्सर होऊन दोन्ही डोळ्यांची दृष्टी त्यानी गमावली होती. प्रथम या रुग्णाचा डोळ्याचा अल्सर औषधोपचाराने बरा करण्यात आला.
सबंधित रुग्णाला रक्तातील कावीळ असल्याने कॉर्निया ट्रान्सप्लांट करणे गुंतागुंतीचे होते. मात्र डॉ. सुप्रिया घोरपडे व त्यांच्या टीमने हे आव्हान स्वीकारत या रुग्णावर नेत्ररोपण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांच्या एका डोळ्यावर कॉर्निया ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यात आली असून या रुग्णाला पुन्हा दृष्टी मिळाली आहे. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली आहे.
नेत्र विभागप्रमुख डॉ. मिलिंद सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुप्रिया घोरपडे, डॉ. षडाक्षरी मठ, डॉ. सोनल गोवईकर यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली.
गेल्या २० वर्षांपासून अविरत रुग्णसेवा देणाऱ्या डी. वाय. पाटील हॉस्पिटलने अंध बांधवांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी ४ महिन्यापूर्वी ‘ज्ञानशांती आय बँक’ची स्थापना केली आहे. त्यानंतर प्रथमच ही नेत्ररोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आनुवंशिक आजार, जंतुसंसर्ग, अपघात आणि डोळ्याशी संबंधित काही आजार यामुळे बुब्बुळाची पारदर्शकता नष्ट होते व त्यामुळे अंधत्व येते. विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यात उसाच्या शेतीमुळे फंगल अल्सरची व त्यामुळे दृष्टी गमावण्याचा धोका अधिक आहे. अशा रुग्णामध्ये बुब्बुळ रोपण करून पुन्हा दृष्टी मिळवणे शक्य असल्याचे डॉ. सुप्रिया घोरपडे यांनी सांगितले.
डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या आजारावर डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार उपलब्ध आहेत. एका व्यक्तीने केलेल्या नेत्रदानामुळे किमान दोन व्यक्तीना दृष्टी मिळू शकते. त्यामुळे मरणोत्तर नेत्रदानासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन वैदयकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड यांनी यावेळी केले.
या यशस्वी नेत्ररोपणाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉ वैशाली गायकवाड यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.