माझं शहर माझी जबाबदारी’ अंतर्गत शुक्रवारी शहरात महास्वच्छता मोहीम
schedule26 Feb 26 person by visibility 117 categoryराज्य
▪️महास्वच्छतेत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा : महापौर रुपाराणी निकम
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने ‘माझं शहर माझी जबाबदारी’ या उपक्रमाअंतर्गत शुक्रवार दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी शहरात व्यापक महास्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. महापौर रुपाराणी निकम यांच्या संकल्पनेतून आयोजित या विशेष उपक्रमात महापालिकेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
सकाळी 7.00 वाजता तावडे हॉटेल येथील शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ महापौर सौ. रुपाराणी निकम व आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
महास्वच्छता मोहिमेत शहरातील प्रमुख मार्गांचा समावेश असून विभागीय कार्यालय क्र. 1 (गांधी मैदान परिसर) : शेंडा पार्क ते इंदिरा सागर हॉल, आर.के. नगर नाका ते शेंडा पार्क चौक, रंकाळा टॉवर ते तलवार चौक, तलवार चौक ते शालिनी पॅलेस, तलवार चौक ते चिवा चौक (जुना वाशी नाका). विभागीय कार्यालय क्र. 2 (छ. शिवाजी मार्केट परिसर) : रंकाळा टॉवर ते फुलेवाडी फायर स्टेशन, दसरा चौक ते उमा टॉकीज ते रेणुका मंदिर चौक ते हॉकी स्टेडियम. विभागीय कार्यालय क्र. 3 (राजारामपुरी परिसर) : छ. शाहू मिल चौक ते केएसबीपी चौक ते टेंबलाई नाका, कावळा नाका ते दाभोळकर कॉर्नर चौक ते दसरा चौक. विभागीय कार्यालय क्र. 4 (छ. ताराराणी मार्केट परिसर) : टेंबलाई नाका ते कावळा नाका ते धैर्यप्रसाद चौक, सीपीआर चौक ते कलेक्टर ऑफिस चौक ते धैर्यप्रसाद हॉल, तसेच तावडे हॉटेल ते कावळा नाका येथे विभागनिहाय स्वच्छता केली जाणार आहे.
या मोहिमेद्वारे रस्ते, दुभाजक व फुटपाथ यांची स्वच्छता करण्यात येणार असून रस्त्यावरील साचलेली खरमाती, तणकट तसेच फुटपाथवरील अडथळा निर्माण करणारी झाडे-झुडपे हटविण्यात येणार आहेत. या उपक्रमात सुमारे चार हजारांहून अधिक स्वच्छतादूत सहभागी होण्याची शक्यता आहे.
या महास्वच्छता मोहिमेत निसर्गप्रेमी, तालीम मंडळे, विविध स्वयंसेवी संस्था, व्यापारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापौर रुपाराणी निकम व आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.