नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती द्या : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर
schedule15 May 26 person by visibility 171 categoryराज्य
▪️महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जल जीवन मिशन योजनेचा घेतला आढावा
शिरोळ : शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावाला स्वच्छ, शुद्ध व मुबलक पाणी मिळाले पाहिजे, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच जल जीवन मिशन योजनांची कामे तातडीने पूर्ण करावेत. तालुक्याला कृष्णा, पंचगंगा, दूधगंगा आणि वारणा या नद्यांचे वरदान लाभले आहेत त्यामुळे प्रत्येक गावाला मुबलक आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा झालाच पाहिजे. योजनेसंदर्भातील प्रलंबित कामे रखडू नयेत, गावागावातील तांत्रिक व प्रशासकीय अडचणी तातडीने सोडवाव्यात आणि नागरिकांना नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करावे, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समन्वय ठेवून काम केल्यास तालुक्यातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट निश्चितच पूर्ण होईल, असे सांगून शिरोळ तालुक्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जल जीवन मिशन योजनांच्या कामांना गती देऊन ती तातडीने पूर्णत्वास न्यावीत, अशा स्पष्ट सूचना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रशासनाला दिल्या.
शिरोळ तालुक्यात महाराष्ट्र जीवज प्राधिकरण योजनेअंतर्गत
हरोली नांदणी, यड्राव, खोतवाडी तारदाळ तर जलजीवन मिशन या योजनेअंतर्गत ४२ गावात कामे सुरू असून या सर्व कामांच्या आढावा बैठकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते.
बैठकीच्या प्रारंभी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता लोहार व जीवज प्राधिकरण योजनेचे सोनलकर यांनी तालुक्यात सुरू असलेल्या विविध पाणीपुरवठा योजनांची माहिती सादर केली. विविध गावांमध्ये सुरू असलेल्या कामांचा प्रगती अहवाल, प्रलंबित कामे, निधीची स्थिती तसेच तांत्रिक अडचणींबाबत सविस्तर माहिती यावेळी दिली.
यावेळी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले, प्रत्येक गावाला स्वच्छ, शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने शासनाने जलजीवन मिशन योजना मंजूर केली आहे. या योजनांची कामे कोणत्याही परिस्थितीत रखडू देऊ नयेत. ज्या गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांच्या कामात अडथळे येत आहेत, त्या ठिकाणच्या समस्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून सोडविल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाने देखील केवळ कागदी पूर्तता न करता प्रत्यक्ष कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी आमदार यड्रावकर यांनी तालुक्यातील विविध गावांतील सुरू असलेल्या योजनांचा स्वतंत्र आढावा घेतला. काही गावांमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक व स्थानिक अडचणींबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत तातडीने निपटारा करण्याचे आदेश दिले. तसेच शेतकऱ्यांकडून जागा उपलब्ध होण्याबाबत अडचणी आहेत, त्या ठिकाणी गावनिहाय बैठका आयोजित करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. तसेच या बैठकींना स्वतः उपस्थित राहून प्रश्न सोडवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. काही कंत्राटदारांनी योजना प्रलंबित ठेवल्याचे निदर्शनास आल्यावर संबंधितांना कडक सूचना देत सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले. जनतेला वेळेत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही कंत्राटदारांनी देयके मिळण्यात येणाऱ्या अडचणीमुळे काम करण्यास असमर्थता व्यक्त केली असता, आमदार यड्रावकर यांनी शासकीय देयके निश्चितपणे मिळणार असल्याचे सांगत कोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. ज्या ठिकाणी महावितरणकडून वीज कनेक्शन मिळालेले नाही, त्या ठिकाणी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले. यासोबतच गाव पातळीवरील सर्व नेतृत्वाने कंत्राटदारांना काम करताना कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या बैठकीस जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती श्रीमती श्रद्धाताई गायकवाड, जि.प. सदस्य अमोल चव्हाण, प्रचिता कोळी, पंचायत समिती शिरोळच्या उपसभापती मनीषा कदम, पंचायत समिती सदस्य प्रवीण देसाई, अविनाश पाटील, प्रवीण पाटील, सीमाताई म्हैशाळे, फजलेअली पटेल, प्रशासनातर्फे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, पाणीपुरवठा उपअभियंता लोहार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता सोनवलकर, बांधकाम उपअभियंता हुपरे, नायब तहसीलदार विलास भिसे तसेच संबंधित गावांचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, महसूल अधिकारी व सर्व योजनांचे कंत्राटदार उपस्थित होते.