आचार्य अत्रे विशेषांक: वाचनीय व संग्राह्य
schedule11 Mar 25 person by visibility 236 categoryसामाजिक

मुंबई : येथील 'साक्षीदार प्रकाशन'ने आचार्य अत्रे विशेषांक प्रकाशित केला आहे. हा अंक साहित्यप्रेमी व अत्रेप्रेमींसाठी वाचनीय असा संग्राह्य आहे.
या अंकात आचार्य अत्रे यांच्या 'मराठा' मध्ये काम केलेल्या ज्येष्ठ पत्रकार व लेखक मधुकर भावे यांचा "अत्रे साहेबांच्या महाराष्ट्र निष्ठा बावनकशी सोन्यासारख्या!" हा परखड लेख सध्याच्या राजकारण्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. "आचार्य अत्रे: एक महान आश्चर्य" हा शिरीष पै यांच्या प्रस्तावनेसह दै.नवाकाळचे उपसंपादक दत्ता बारस्कर यांचा अभ्यासपूर्ण लेख यात समाविष्ट आहे. याशिवाय योगेश त्रिवेदी, प्राचार्य जी.एन.हंचे, बाळ सिंगासने, सुभाषचंद्र खरे, सुरेंद्र तेलंग, सुरेश देहेरकर, शिरीष पै, डी.बी.जगतपुरीया, उमा बंड भारती सावंत, रवींद्र वाळिंबे, चंद्रसेन टिळेकर, सुरेंद्र तेलंग, अशोक हांडे, डॉ.आशितोष रारावीकर, निवेदिता लागू, सौ.शुभा नाईक, भा.ल.महाबळ आदी पत्रकार व साहित्यिक यांनी आचार्य अत्रे यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे.
साप्ताहिक करवीर काशी चे संपादक व लेखक डॉ. सुनीलकुमार सरनाईक यांच्या "महाराष्ट्राचे लाडके अष्टपैलू व्यक्तिमत्त्व" या प्रदीर्घ लेखातून अत्रे यांचे कर्तृत्व व त्यांच्या हजरजबाबी विनोदी स्वभावाचे पैलू सविस्तर मांडले आहेत. विशेष म्हणजे अत्रे यांच्या निधनानंतर महाराष्ट्र टाइम्स मध्ये आलेला "कडा कोसळला" हा अग्रलेख वाचायला मिळतो. सर्वच लेख अभ्यासपूर्ण व वाचनीय आहेत, विशाल धाडवे यांचे रंगीत मुखपृष्ठ आकर्षक झाले आहे. साहित्यिक, पत्रकार व समाजशास्त्राच्या अभ्यासकांनी संग्रही ठेवावा, असा हा अंक आहे.
✍️ डॉ सुनीलकुमार सरनाईक, कोल्हापूर
आचार्य अत्रे विशेषांक
संपादक: सत्यवान तेटांबे,
साक्षीदार प्रकाशन, डी/३०३,
क्रेमलिन, जयराजनगर बोरीवली पश्चिम, मुंबई ४०००९१
मूल्य:₹.२५०/-