खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या ऐश्वर्याचे सुवर्ण!
schedule15 May 25 person by visibility 237 categoryक्रीडा

अतिग्रे : नुकत्याच पाटणा, बिहार येथे पार पडलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स २०२५ मध्ये कोल्हापूरची टेनिसस्टार ऐश्वर्या दयानंद जाधव हिने उत्तुंग कामगिरी करत महाराष्ट्राच्या मानचिन्हात भर घातली आहे. ऐश्वर्याने लॉन टेनिसच्या डबल्स इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक पटकावताना, सिंगल्समध्ये रौप्य पदक जिंकून आपली कौशल्यपूर्ण कामगिरी सिद्ध केली.
सिंगल्स स्पर्धेतील प्रवास खालीलप्रमाणे:
पहिल्या फेरीत ऐश्वर्याने हंसिका सिंह (बिहार) हिला 6-2, 6-0 असा सरळ सेटमध्ये पराभूत करत विजयी सुरुवात केली. दुसऱ्या फेरीत तिने काशवी सुनील (कर्नाटक) हिचा 6-3, 6-2 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत तिने लक्ष्मीश्री दांडू (तेलंगणा) हिला एका चुरशीच्या लढतीत 3-6, 6-4, 6-2 असे हरवत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत, रिशिता बासिरेड्डी (तेलंगणा) विरुद्ध सामना अत्यंत अटीतटीचा ठरला. ऐश्वर्याने पहिला सेट 1-6 ने गमावला, दुसरा 6-2 असा जिंकून बरोबरी साधली, परंतु तिसऱ्या सेटमध्ये 3-6 ने पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ऐश्वर्याने सिंगल्समध्ये रौप्य पदक पटकावले.
▪️डबल्स स्पर्धेतील सुवर्ण झळाळी:
ऐश्वर्या जाधव आणि तिची साथीदार आकृती सोनाकुसरे (महाराष्ट्र) या जोडीने लॉन टेनिस डबल्स इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक पटकावले.
पहिल्या फेरीत, हरियाणाच्या जोडीदार आदिती रावत आणि आदिती त्यागी अनुपस्थित राहिल्यामुळे महाराष्ट्राच्या जोडीने थेट पुढील फेरीत प्रवेश केला.
उपांत्य फेरीत, त्यांनी शगुनकुमारी आणि महिका खन्ना (उत्तर प्रदेश) ह्यांना 6-1, 6-1 असा दणदणीत पराभव दिला.
अंतिम फेरीत, त्यांनी रिशिता बसिरेड्डी आणि लक्ष्मीसरी दांडू (तेलंगणा) ह्यांना 6-0, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये नमवून सुवर्ण पदक मिळवले. ऐश्वर्याची आंतरराष्ट्रीय लेवलला ज्युनियर वर्ल्ड रँकिंग टूरमध्ये पण चमकदार कामगिरी सुरू आहे.
ऐश्वर्या जाधव ही संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथील इयत्ता 12 वी ची विद्यार्थिनी असून सध्या ती अल्टेव्हल टेनिस अकॅडमी , अहमदाबाद येथे प्रशिक्षण घेत आहे. तिला श्रीमल भट आणि अर्शद देसाई ह्यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
संस्थापक संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालिका सस्मिता मोहंती, प्राचार्य नितेश नाडे यांनी ऐश्वर्याचे अभिनंदन केले.