मेंडोलीन वादक प्रदीप्तो सेनगुप्ता, बासरीवादक किरण विणकर, हार्मोनियम वादक सचिन जांभेकर यांच्या तालासुरांची जुगलबंदी ऑल टाईम हिटस् या कार्यक्रमातू रसिकांना अनुभवता येणार
schedule06 Dec 25 person by visibility 65 categoryसामाजिक
कोल्हापूर: नाकोडा म्युझीक ॲकॅडमी आणि कोल्हापूरातील सुप्रसिद्ध गायक नितीन सोनटक्के यांनी अनेक सांगीतिक मैफली गाजवल्या आहेत.. आता कोल्हापूरकर रसिकांना वाद्यांच्या जुगलबंदीची अनोखी मैफील अनुभवता यावी यासाठी तीन महान वादकांच्या सहभागातुन ऑल टाईम हिटस् या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुंबईचे प्रसिद्ध मेंडोलीन वादक प्रदीप्तो सेनगुप्ता, मुंबईचे प्रसिद्ध बासरीवादक किरण विणकर आणि पुण्याचे प्रसिद्ध हार्मोनियम वादक सचिन जांभेकर यांच्या तालासुरांची जुगलबंदी रसिकांना अनुभवता येणार आहे. अशी माहीती प्रदीप राठोड, नितीन सोनटक्के यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापुरच्या रसिकांसाठी हा कार्यक्रम मंगळवार 9 डिसेंबरला सायं. 5 वाजता देवल क्लबमधील गोविंदराव टेंबे रंगमंदीरात होणार आहे.
या कार्यक्रमातील प्रदीप्तो सेनगुप्ता हे कलकत्याचे असून 1988 साली मुंबईत आल्यानंतर ते स्वर्गीय आर.डी. बर्मन यांच्या वादयवृंदामध्ये सहभागी झाले. त्यानंतर जतीन ललीत, आनंद मिलींद, नदीम = श्रवण, लक्ष्मीकांत प्यारेलाल, यासह अन्य संगीतकारांसोबत प्रदीप्तो यांनी काम केले आहे. तुम पास आये, निंबूडा, मेरे रश्के कमर. या सारख्या गाण्यांच्या निर्मितीत त्यांचा सहभाग आहे. तसेच रुतू हिरवा, गारवा यासारख्या मराठी गाण्यांमध्येही त्यांच्या वादनाचे योगदान आहे. तर किरण विणकर हे मुंबईचे असून त्यांनी आघाडीच्या सर्वच संगीतकारांसोबत काम केले आहे. अनेक गाजलेले हिंदी आणि मराठी गाण्यांसाठी विणकर यांनी बासरीवादन केले आहे.
त्याचबरोबर इंडीयन आयडॉल सीझन 12,13, आणि 14 साठी बासरीवादन करुन ते घराघरात पोचले आहेत. त्याचप्रमाणे पुण्याचे प्रसिद्ध हार्मोनिअम वादक सचिन जांभेकर हे गेल्या 35 वर्षापासून देश - विदेशातील विवीध कार्यकमामध्ये वादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे वादनातील कौशल्य पाहून आशा भोसले यांनी स्व. आर.डी. बर्मन यांची मुळ हार्मोनियम त्यांना भेट म्हणून दिली आहे. अशा या तीन दिग्गज कलाकारांची अदाकारी अनुभवता येणार आहे. त्यांना स्थानिक वादकांची संगीत साथ लाभणार असून विश्वराज जोशी निवेदन करणार आहेत. वाद्यांचा हा अप्रतिम कलाविष्कार अनुभवण्यासाठी रसिकांनी मंगळवारी 9 डिसेंबरला देवल क्लब मध्ये उपस्थित राहण्याचं आवाहन नितीन सोनटक्के यांनी केले आहे.