५०० हून अधिक भाताचे प्रकार बनवून कोल्हापुरात नवा जागतिक विक्रम रचणार; मास्टर शेफ दिग्विजय भोसलेंची घोषणा
schedule22 Apr 26 person by visibility 121 categoryसामाजिक
कोल्हापूर: येथील 'अश्विनी भोसले हॉस्पिटॅलिटी अँड कलिनरी इन्स्टिट्यूट'च्या वतीने खाद्यक्षेत्रात एक ऐतिहासिक जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. मास्टर शेफ दिग्विजय भोसले आणि त्यांची टीम एकाच वेळी जगातील विविध खाद्यसंस्कृतींमधील ५०० हून अधिक भाताचे प्रकार तयार करून नवा विश्वविक्रम नोंदवण्यासाठी सज्ज झाली आहे.
याआधी सर्वात मोठी 'मिसळ' तयार करण्याचा विक्रम नावावर असलेल्या शेफ भोसले यांनी, कोल्हापूरच्या खाद्य संस्कृतीचे वेगळेपण जागतिक स्तरावर नेण्यासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमात १० अनुभवी शेफसह संस्थेच्या प्रतिभावान विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असणार आहे. यामध्ये भारतीय परंपरेतील बिर्याणी, पुलाव, खिचडी यांपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील रिसोटो, पायला आणि सुशी यांसारख्या वैविध्यपूर्ण पदार्थांची रेलचेल असेल. केवळ विक्रम प्रस्थापित करणे हाच उद्देश नसून, भाताच्या माध्यमातून जागतिक खाद्यसंस्कृतीचा गौरव करणे, विद्यार्थ्यांना व्यावसायिक अनुभव देणे आणि सांस्कृतिक समन्वय साधणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे शेफ दिग्विजय भोसले यांनी नमूद केले आहे. या आगळ्यावेगळ्या प्रयत्नाकडे आता संपूर्ण खाद्यप्रेमींचे लक्ष लागले आहे.