विश्वकर्मा पुरस्कारासाठी 21 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत
schedule16 Feb 26 person by visibility 106 categoryराज्य
कोल्हापूर : विमुक्त जाती व भटके जमाती या प्रवर्गातील पारंपरिक लोक कलाकारांना नटराज पुस्कार आणि पारंपरिक कारागिरांना विश्वकर्मा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. नटराज पुस्कार व्यक्तीसाठी एक तसेच विश्वकर्मा पुरस्कार व्यक्तीसाठी एक याप्रमाणे शासन स्तरावरून देण्यात येणार आहे. सन 2025-26 या वर्षाकरीता नटराज पुरस्कार तसेच विश्वकर्मा पुरस्कार देण्यात येणार असून जिल्ह्यातील या समाजातील इच्छुक व्यक्तींनी पुरस्कारासाठी आपले अर्ज दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, कोल्हापूर या कार्यालयात आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन समाज विभागाच्या सहायक संचालक सुनिता नेर्लीकर यांनी केले आहे.
विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी कार्य करणारे पारंपरिक लोककलाकार व पारंपरिक कारागिर यांच्यासाठी आवश्यक पात्रता- या योजनेनुसार विमुक्त जाती व भटक्या जमातीकरीता सामाजिक, कलात्मक व प्रबोधन इत्यादी क्षेत्रात काम करीत असलेल्या पारंपरिक लोककलाकार, लोककलावंत (उद्दिष्टामध्ये नमूद केल्याप्रमाणे जाती, उपजाती व तत्सम) असावेत. विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी सामाजिक, कलात्मक व प्रबोधन इत्यादी क्षेत्रात कमीत-कमी दहा (१०) वर्ष कार्य केलेले असावे.
पुरस्कार देताना पुरुषांचे वय ४५ वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे तर स्त्रियांचे वय ४० वर्ष अथवा त्यापेक्षा जास्त असावे. अपवादात्मक प्रकरणी वय शिथिल करण्याचे अधिकार शासनाने यासाठी नियुक्त केलेल्या समितीकडे राहतील. कोणत्याही व्यक्तीस एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही. पुरस्कार मिळण्यास पात्रता व्यक्तिगत, मौलिक कार्यावरून ठरविण्यात येईल. समाजातील त्यांच्या पदाचा याबाबतीत विचार करण्यात येणार नाही. पुरस्कार मिळण्यास आमदार, खासदार / जिल्हा परिषद सभासद किंवा कोणताही लोकप्रतिनिधी पात्र असणार नाही. वरील क्षेत्रात कमीत- कमी १० वर्षे वैयक्तिक किंवा संघटनात्मक अभिजात कार्य करणाऱ्या व्यक्ती या पुरस्कारास पात्र असतील.
अधिक माहितीसाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तिसरा मजला, विचारे माळ, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.