कोल्हापुरात १७ सप्टेंबरपासून लष्कर भरती मेळावा
schedule07 Sep 26 person by visibility 120 categoryराज्य
कोल्हापूर : अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय लष्कराच्या कोल्हापूर सैन्य भरती कार्यालयामार्फत छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल येथे १७ ते २९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत लष्कर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र व गोवा राज्यातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देतानाच देशसेवेची संधी मिळावी, हा या भरती मेळाव्याचा उद्देश आहे.
या भरती प्रक्रियेत अग्निवीर जनरल ड्युटी (ऑल आर्म्स), अग्निवीर टेक्निकल (ऑल आर्म्स) तसेच अग्निवीर ट्रेड्समन (ऑल आर्म्स) १० वी व ८वी उत्तीर्ण पदांसाठी भरती केली जाणार आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग व रत्नागिरी तसेच गोवा राज्यातील उत्तर गोवा व दक्षिण गोवा जिल्ह्यातील अधिवासी उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत.
ऑनलाईन कॉमन एन्टरन्स परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांचे प्रवेशपत्र सप्टेंबर २०२६ च्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या वैयक्तिक ई-मेलवर भारतीय लष्कराच्या अधिकृत भरती संकेतस्थळावर पाठविण्यात येणार आहे.
उमेदवारांनी भरतीच्या ठिकाणी मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, पोलीस पडताळणी प्रमाणपत्र, आवश्यक छायाचित्रांच्या प्रती आणि अधिसूचनेतील नमुन्यानुसार योग्यरीत्या भरलेले प्रतिज्ञापत्र सोबत आणावे. उमेदवारांनी भरतीपूर्वी प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून तात्पुरत्या वैद्यकीय समस्या, किंवा कानात मळ असणे यांसारख्या बाबींबाबत प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. या उपाययोजनांमुळे तरुणांना भरती मेळाव्यात सुरळीतपणे सहभागी होता येईल आणि लष्करी अधिकाऱ्यांना मेळावा निर्दोषपणे पार पाडण्यास मदत होईल.
वैध प्रवेशपत्र, प्रतिज्ञापत्र व आवश्यक कागदपत्रे असलेल्या उमेदवारांनाच भरतीस्थळी प्रवेश दिला जाणार आहे. भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून उमेदवारांनी कोणत्याही दलाल अथवा मध्यस्थाच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन लष्कर भरती कार्यालयाने केले आहे. भरती मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.