SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : शाहू क्लॉथ मार्केटमधील थकबाकी असलेले 60 गाळे सीलमहापालिका कामांना गती देत विभागीय स्तरावर निर्णयक्षमता वाढविण्याचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचे निर्देशनाविन्यपूर्ण विचारातून उद्योगक्षेत्रातील संधीचा लाभ घ्या : डॉ. राकेश कुमार शर्माशिवाजी विद्यापीठात फुलले ‘कास’...!मुंबई उपनगर जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढकोरे अभियांत्रिकीत ‘मल्टी-बिझनेस मॉडेल इनोव्हेशन’वर आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शनविद्यापीठात मोडी लिपी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरूआंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्य दिन: जागतिक शांतता आणि सुरक्षेचा पायाछत्रपती शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे : कादंबरीकार मेधा देशमुख भास्करनआरोग्य सेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

जाहिरात

 

महापालिका कामांना गती देत विभागीय स्तरावर निर्णयक्षमता वाढविण्याचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचे निर्देश

schedule07 Sep 26 person by visibility 86 categoryमहानगरपालिका

◼️संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह 20 सप्टेंबरअखेर सुरू करण्याचे नियोजन; विविध विभागांच्या कामांचा आढावा

कोल्हापूर : शहरातील विविध विकासकामे, नागरी सुविधा, महसूलवाढ, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा तसेच आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामांना गती देण्याच्या सूचना आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांनी बंधित विभागप्रमुखांना दिल्या. नागरिकांच्या समस्या विभागीय कार्यालय स्तरावरच तातडीने सोडविण्यासाठी आवश्यक ते अधिकार प्रदान करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले. आयुक्त कार्यालयात आयोजीत आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीत संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे बुकिंग सुरू करण्यासाठी अद्ययावत सॉफ्टवेअर आजच अंतिम करावे, अशा सूचना सिस्टीम मॅनेजर यांना देण्यात आल्या. साधारणतः २० सप्टेंबरच्या दरम्यान नाट्यगृह सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक नियोजन पूर्ण करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. घरफाळा, अतिक्रमण, परवाना आदी विषयांबाबत सहा.आयुक्तांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी व प्रश्नांसाठी प्रत्येक बाब आयुक्तांपर्यंत न आणता विभागीय कार्यालय स्तरावरच निर्णय घेऊन कामे मार्गी लावावीत अशा सूचना सहाय्यक आयुक्तांना देण्यात आल्या. यासाठी आवश्यक ते आणखीन अधिकार विभागीय स्तरावर देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. मुख्य रस्त्यांच्या स्वच्छतेचे काम आऊटसोर्सिंग पद्धतीने करण्यासाठी निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले. 

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अधिकृत बायोमेट्रिक धारक निश्चित करून त्यानुसार कारवाईमध्ये सातत्य ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुसार कायदेशीर करण्याच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना सर्व सहा.आयुक्तांना देण्यात आल्या. कोचिंग क्लासेस व लॉजिंगमध्ये कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी संबंधित आस्थापनांची तपासणी करून आवश्यकतेनुसार सील करण्याची कारवाई करण्यात यावी. त्यापूर्वी संबंधितांना एक महिन्याची मुदत देऊन आवश्यक त्या त्रुटी दूर करुन परवाना घेण्याचे आवाहन करावे. मुदतीनंतरही त्रुटी दूर न केल्यास त्यांच्यावर कारवाई करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. महापालिकेच्या शाळा तसेच सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना उप-शहर अभियंता यांना देण्यात आल्या. 

पाणीपुरवठा व ड्रेनेज दुरुस्तीला प्राधान्य

शहरातील पाण्याची गळती दुरुस्ती, पाण्याच्या टाक्यांची वर्षातून नियमित स्वच्छता, सिक्युरिटी गार्डची व्यवस्था, जुन्या पाईपलाईन बदलणे तसेच ड्रेनेज लिकेज दुरुस्ती यासाठी आवश्यक आराखडा तयार करून त्यासाठी एजन्सी निश्चित करण्याच्या सूचना जल अभियंता यांना देण्यात आल्या. ग्रामीण भागातील अनधिकृत कनेक्शनवरही कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. थकबाकी वसुलीबाबत ग्रामसेवक व सरपंचांची बैठक घेऊन प्रभावी पाठपुरावा करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्तांना देण्यात आल्या.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीच्या सूचना

गणपती आगमन व विसर्जन मार्गावरील झाडांच्या धोकादायक व अडथळा निर्माण करणाऱ्या फांद्यांची तातडीने छाटणी करण्याच्या सूचना उद्यान विभागाला देण्यात आल्या.

 महापालिकेला सीएसआरच्या माध्यमातून उपलब्ध झालेले एलईडी दिवे तातडीने बसवून घेण्याबरोबरच बँकेच्या माध्यमातून आणखीन दिवे सीएसआरअंतर्गत उपलब्ध करून घेण्याच्या सूचना लेखापालांना देण्यात आल्या. शहरात सुरू असलेल्या आधुनिक ‘इन्स्टा रोड पॅचर’ तंत्रज्ञानाच्या पॅचवर्कसोबतच विभागीय कार्यालयांमार्फतही पॅचवर्कची कामे सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. वॉरंटी कालावधीत असलेल्या रस्त्यांची आवश्यक दुरुस्ती तातडीने करून घेण्याचे निर्देशही देण्यात आले.

केएमटीच्या ई-लिलावाबद्दल अतिरिक्त परिवहन व्यवस्थापकांचे अभिनंदन

केएमटीच्या स्क्रॅप साहित्याच्या ई-लिलावाची प्रक्रिया चांगल्या पद्धतीने पार पडून अपेक्षेपेक्षा जादा दराची बोली प्राप्त झाल्याबद्दल उप-आयुक्त व अतिरिक्त परिवहन व्यवस्थापकांचे आयुक्तांनी अभिनंदन केले. तसेच ई-बसेस सुरू करण्यासाठी आवश्यक उद्घाटनाची तारीख निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

घरफाळा वसुलीला गती; व्यावसायिक मालमत्तांवर लक्ष

घरफाळा वसुलीसाठी दर महिन्याच्या शनिवार-रविवारी विशेष कॅम्प घेऊन नवीन मालमत्तांना घरफाळा लावावा तसेच थकबाकीदारांवर नियमानुसार कारवाई करावी अशा सूचना देण्यात आल्या. शहरात ज्या ठिकाणी कमर्शियल प्रॉपर्टी आढळून येत आहेत त्या ठिकाणी नियमानुसार कमर्शियल घरफाळा आकारण्यात यावा असेही निर्देश देण्यात आले. कनिष्ठ लिपिकांना टायपिंग व संगणकाचे काम येत नसल्यास त्यांना वसुलीच्या कामासाठी नियुक्त करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

यावेळी अतिरिक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, डॉ.विजय पाटील, संजय सरनाईक, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, नगरसचिव सुनील बीद्रे, उपशहर रचनाकर महादेव फुलारी, पदमल पाटील, उपशहर अभियंता सुरेश पाटील, निवास पोवार, अरुणकुमार गवळी, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, वर्कशॉप प्रमुख संजय भोसले, विवाह निबंधक दिवाकर कारंडे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, विद्युत अभियंता नारायण पुजारी, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंह रजपूत, रवका अधिकारी प्रशांत पंडत आदी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes