इचलकरंजी थरार: महासत्ता चौकातील फायरिंग प्रकरणातील दोन्ही आरोपींना २४ तासांत बेड्या!
schedule05 Mar 26 person by visibility 83 categoryगुन्हे
इचलकरंजी : इचलकरंजीतील महासत्ता चौकात बुधवारी रात्री झालेल्या गोळीबार (Firing) प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) यश आले आहे. जुन्या वादातून ओमकार कांबळे याच्यावर गोळीबार करून दहशत माजविणाऱ्या अनुराग सूर्यवंशी आणि ओमकार शेंडे या दोन्ही संशयितांना पोलिसांनी रेणुका माता मंदिर परिसरातून शिताफीने अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी ओमकार कांबळे आणि आरोपी अनुराग सूर्यवंशी यांच्यात जयसिंगपूर येथे जुना वाद होता. ४ मार्च रोजी रात्री ८ च्या सुमारास ओमकार कांबळे हा अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातून काम उरकून मोटारसायकलवरून जात असताना, दोन्ही आरोपींनी पाळत ठेवून त्याच्यावर अग्नीशस्त्राने गोळी झाडली. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली होती.
LCB ची धाडसी कारवाई घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आरोपींना तात्काळ पकडण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि सपोनि सागर वाघ यांच्या पथकाने तांत्रिक माहिती आणि खबऱ्यांच्या मदतीने सापळा रचला. पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, रेणुका माता मंदिर परिसरातून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना पुढील तपासासाठी इचलकरंजी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.