७० हजारांची लाच; पंटर सापडला, कॉन्स्टेबल पसार
schedule01 Nov 25 person by visibility 208 categoryगुन्हे
कोल्हापूर : महाराष्ट्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत दक्षता जनजागृती सप्ताह सुरू असतानाच शनिवारी (दि. १) दुपारी कारवाई करण्यात आली हुपरी येथील जुगार अड्डयावर केलेल्या कारवाईनंतर गुन्हा दाखल न करण्यासाठी ७० हजारांची लाच घेणारा पंटर रणजित आनंदा बिरांजे (वय ३८, रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले) हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. पट्टणकोडोली येथे बिरांजे याच्या घरीच ही कारवाई झाली. दरम्यान पंटरकडून लाचेची मागणी करणारा पोलिस कॉन्स्टेबल संदेश आनंदा शेटे याचा शोध सुरू आहे.
हुपरी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला कॉन्स्टेबल संदेश शेटे याने अन्य दोन अंमलदारांसह गुरुवारी (दि. ३०) सायंकाळी हुपरी येथील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला होता. याबाबत गुन्हा दाखल न करण्यासाठी त्याने जुगार खेळणाऱ्या एका व्यक्तीकडे एक लाखाच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ७० हजार रुपये पंटर रणजित बिरांजे याच्याकडे देण्याचे ठरले. मात्र, तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली.
बिरांजे याने तक्रारदारास पट्टणकोडोली येथील घरीच लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार पथकाने शनिवारी दुपारी बिरांजे याच्या घराजवळ सापळा रचून लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ त्याला पकडले. पंटरकरवी लाचेची मागणी करणारा पोलिस कॉन्स्टेबल शेटे पोलिस ठाण्यात मिळाला नाही.