शिरोळ तालुक्यातील पाच ग्रामपंचायत इमारतींसाठी १ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर; आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा पाठपुरावा
schedule24 Jun 26 person by visibility 295 categoryराज्य
शिरोळ : शिरोळ विधानसभा मतदारसंघातील पाच ग्रामपंचायत इमारतींच्या बांधकामासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून तब्बल १ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे ग्रामपंचायतींना स्वतःची सुसज्ज व प्रशस्त प्रशासकीय इमारत उभारता येणार असून ग्रामस्थांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहे.
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना अंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये यड्राव, कुटवाड, तमदलगे, अर्जुनवाड आणि घालवाड या पाच ग्रामपंचायतींना प्रत्येकी २५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. एकूण १ कोटी २५ लाख रुपयांच्या या निधीमुळे ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
ग्रामपंचायत ही ग्रामीण विकासाची केंद्रबिंदू संस्था मानली जाते. अनेक गावांमध्ये प्रशासकीय कामकाजासाठी पुरेशा सुविधा नसल्याने नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. नव्या इमारतींमुळे ग्रामपंचायतींचे कामकाज अधिक सुलभ, गतिमान आणि लोकाभिमुख होणार असून नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा मिळणार आहेत.
या निधी मंजुरीबाबत आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले आहेत.