शाश्वत अभियांत्रिकीच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवा : कुणाल जगदाळे
schedule02 Oct 26 person by visibility 184 categoryशैक्षणिक
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये मार्गदर्शन
कोल्हापूर : भविष्यातील अभियंत्यांनी तंत्रज्ञान, समाज आणि पर्यावरण यांचा समतोल साधणारे उपाय विकसित करण्यावर भर द्यावा. तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत पर्यावरणीय जबाबदारी स्वीकारणे ही आजच्या अभियंत्यांची गरज असून शाश्वत अभियांत्रिकीच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवावे असे आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाचे असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर कुणाल जगदाळे यांनी केले.
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, कसबा बावडा येथे अभियंता दिनानिमित्त ‘शाश्वत भविष्यासाठी अभियांत्रिकी’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. जगदाळे म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वयंचलित तंत्रज्ञान आणि डेटा-आधारित प्रणालींमुळे अभियांत्रिकी क्षेत्र वेगाने बदलत असून, विद्यार्थ्यांनी बदलत्या तंत्रज्ञानासोबत स्वतःची कौशल्ये अद्ययावत ठेवावीत.
करिअरची निवड करताना केवळ सध्याच्या संधींचा विचार न करता आवड, क्षमता, कौशल्ये आणि भविष्यातील संधी यांचा विचार करावा. संबंधित क्षेत्रात सखोल ज्ञान व विशेष प्रावीण्य मिळविण्याचे ध्येय विद्यार्थ्यांनी ठेवावे, असा सल्ला त्यांनी दिला.
डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे डेटा सेंटर्सचे महत्त्व वाढत आहे. मात्र त्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जा, पाणी आणि इतर नैसर्गिक संसाधनांची गरज भासते. त्यामुळे ऊर्जा कार्यक्षमता, नवीकरणीय ऊर्जा, जलव्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट संचालक डॉ. अजित पाटील यांनी स्वागत केले. शाश्वत विकासासाठी अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची असून, कृत्रिम बुद्धिमत्ता व बदलत्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी नवे ज्ञान व कौशल्ये आत्मसात करावीत, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी डॉ. अजित पाटील, डॉ. ए. एम. गुरव, अभिजित पाटील, अमित जाधव, डॉ. ग्रंथेज ओतारी, डॉ. तानाजी पाटील, डॉ. पल्लवी हतकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.