कोयनेचे वीजनिर्मितीनंतरचे पाणी मुंबईला नेण्यास हरकत नाही; मात्र वारणेचे पाणी देणार नाही : हसन मुश्रीफ
schedule24 Nov 26 person by visibility 112 categoryराजकीय
◼️गोकुळचा वाद आता मिटवूया; एकजुटीने दूध संघाची भरारी घेऊया - कागलमधील पत्रकार संवादात मंत्री मुश्रीफांचे स्पष्ट मत
कागल : कोयना धरणातून वीजनिर्मितीनंतर वशिष्ठी नदीमार्गे समुद्रात वाहून जाणारे पाणी जर मुंबईला पिण्यासाठी नेले जात असेल, तर त्यावर आक्षेप असण्याची गरज नाही; मात्र वारणा धरणासारख्या धरणांचे पाणी पश्चिम महाराष्ट्राबाहेर नेऊ देणार नाही आणि शासनाचा तसा विचारही नाही, असे ठाम प्रतिपादन नामदार हसन मुश्रीफ यांनी आज येथे केले. कागल येथील निवासस्थानी आज त्यांनी टीव्ही पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विविध राजकीय व प्रशासकीय विषयांवर त्यांनी रोखठोक भूमिका मांडली.
◼️ कोयना, वारणा आणि मराठवाडा पाणी प्रश्न
* कोयनेचे पाणी आणि सांगली-साताराची भीती: कृष्णा लवादानुसार कोयना धरणातील पाण्याचे वीजनिर्मिती व सिंचनासाठी वाटप ठरलेले आहे. वीजनिर्मितीनंतर सोडलेले पाणी वशिष्ठी नदीतून पुढे समुद्रात जाते; त्याचा सध्या पश्चिम महाराष्ट्रासाठी वापर होत नाही आणि सिंचनाची तरतूद सुरूच आहे. त्यामुळे सांगली व सातारा जिल्ह्यांना पाणी कमी पडेल अशी भीती बाळगण्याचे कारण नाही. आपल्या वाट्याचे पाणी इतरत्र जाणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
* वारणा धरणाचे पाणी सुरक्षित: वारणा धरणाचे पाणी पश्चिम महाराष्ट्राबाहेर जाणार नाही. केवळ पुराचे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी मराठवाड्याला देण्यासाठी मराठवाडा ग्रीड आणि जागतिक बँकेच्या कर्जाच्या माध्यमातून योजना राबवली जाणार आहे. मराठवाड्याचा दुष्काळ हटवणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे.
◼️ 'गोकुळ'चा वाद संपवून संघाच्या विकासासाठी एकत्र येऊया
गोकुळ दूध संघाच्या न्यायालयीन लढाईतील वकिलांच्या फीवरून सुरू असलेल्या आरोपांवर बोलताना मुश्रीफ म्हणाले की, "गोकुळचा वाद आता संपवूया आणि संघ पुन्हा एकदा नावारूपाला आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया," असे आवाहन आपण आठवड्यापूर्वीच केले आहे.
* दूध उत्पादकांना दिलासा: दूध खरेदी दरात म्हशीला प्रतिलिटर ३ रुपये आणि गाईला २ रुपये दरवाढ लागू केल्याबद्दल त्यांनी अध्यक्ष व संचालक मंडळाचे आभार मानले. तसेच केडीसीसी बँकेने म्हशी व गाई खरेदीसाठी आधीच्या १० हजारांवर आणखी १० हजार रुपयांचे वाढीव अनुदान दिल्याची माहिती देत संघाला मोठ्या प्रमाणात 'फ्रेश' दुधाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
* वकिलांच्या फीवर स्पष्टीकरण: मुकुल रोहतगी यांच्या फीबाबत मुंबईत जाऊन माहिती घेऊन बोलू, असे सांगत मुश्रीफ म्हणाले की, "सरकारची बाजू मांडली असेल तर सरकार फी देईल आणि आमच्या बाजूची फी आम्ही स्वतःच्या खिशातून दिली आहे. बाहेरच्या ज्येष्ठ वकिलांना घेण्याची पद्धतच आहे."
* सतेज पाटलांना विनंती: बायलॉजच्या अडचणीमुळे अध्यक्ष निवडता न आल्याची खंत कदाचित आमदार सतेज पाटील यांच्या मनात असावी; मात्र आता हा विषय संपवून संघ एकमताने चालवूया. नागपूर अधिवेशनात भेट झाल्यावर त्यांच्याशी यावर चर्चा करू, असेही मुश्रीफ म्हणाले. उद्या होणाऱ्या सुनावणीबाबत तसेच 'डेडलॉक'च्या आरोपांवर बोलताना त्यांनी, "आता या विषयावर चर्चा बंद; जो निर्णय होईल तो न्यायदेवता ठरवेल," असे स्पष्ट केले.
◼️ रोहित पवार आणि डिलिमिटेशनवर भाष्य
* रोहित पवारांची भूमिका: आमदार रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चावरून त्यांच्याच पक्षाने (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) फारकत घेतल्याचे वर्तमानपत्रात वाचल्याचे सांगत, हा त्यांचा पक्षांतर्गत विषय असल्याचे मुश्रीफ म्हणाले. मात्र, ते ज्या आक्रमकतेने काम करत आहेत आणि डिलिमिटेशनला खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठिंब्याला विरोध करत आहेत, त्यावरून त्यांची भूमिका व कार्यकर्त्यांची भावना स्पष्ट होत असल्याचे त्यांनी नमूद केले. पूर्वी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत, आक्रमकतेतून स्पेस निर्माण करण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट होत असल्याचेही ते म्हणाले.
* डिलिमिटेशनचे स्वागत: मतदारसंघ मोठे झाल्याने लोकप्रतिनिधींना प्रभावी काम करता येत नाही. राज्याचा घटक धरून पुनर्रचना होणार असेल आणि त्याबाबत खासदार सुप्रिया सुळे व द्रमुकने घेतलेली भूमिका जर एनडीएशी चर्चेतून पुढे येत असेल, तर मतदारसंघातील मतदारसंख्या कमी होण्याच्या दृष्टीने डिलिमिटेशन स्वागतार्हच आहे, असे मत मुश्रीफ यांनी व्यक्त केले.