खेबवड्यातील वर्षानुवर्षे बंद असलेला हातपंप पुन्हा सुरू; सागर भोगम यांच्या पाठपुराव्याला यश
schedule23 Nov 26 person by visibility 94 categoryसामाजिक
◼️नागरिकांची पाणीटंचाई दूर; ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त
खेबवडे : खेबवडे गावातील गेल्या पाच ते सात वर्षांपासून बंद अवस्थेत असलेला हातपंप अखेर दुरुस्त करून पुन्हा कार्यान्वित करण्यात आला आहे. सागर भोगम यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर भोगम हे खेबवडे गावभेटीसाठी आले असताना त्यांच्या निदर्शनास गावातील हातपंप अनेक वर्षांपासून बंद असल्याचे आले. या बंद हातपंपाची त्यांनी स्वतः पाहणी केली. दीर्घकाळापासून हातपंप बंद असल्याने स्थानिक नागरिकांना व ग्रामस्थांना पाण्याची गैरसोय सहन करावी लागत होती.
नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन सागर भोगम यांनी तातडीने संबंधित पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि हातपंपाची तात्काळ दुरुस्ती करून तो सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या या पाठपुराव्याची दखल घेत प्रशासनाने आवश्यक ती दुरुस्ती करून हातपंप पुन्हा कार्यान्वित केला.
गेल्या पाच ते सात वर्षांपासून रखडलेली ही दुरुस्ती पूर्ण झाल्याने ग्रामस्थांची पाण्याची गैरसोय दूर झाली असून, लहान-मोठ्या प्रश्नांवर तत्परतेने लक्ष दिल्याबद्दल गावकऱ्यांकडून आनंद व समाधान व्यक्त करण्यात येत आहे.