कोल्हापूर : अलमट्टी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग वाढविल्याबद्दल आमदार सतेज पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आभार मानले आहेत. अलमट्टीतील पाण्याचा विसर्ग एका दिवसात पंधरा हजार क्यूसेक्सवरून पावणेदोन लाख क्यूसेक्सपर्यंत वाढवल्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात राहण्यास मदत झाली आहे. आमदार पाटील यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांना फोन करून याची माहिती दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाल्यामुळे राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडले. त्यामुळे पंचगंगा नदीमध्ये येणाऱ्या पाण्याचा प्रमाणात वाढ होऊन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संभाव्य पुरस्थिती निर्माण झाली. 2019 आणि 2021 मध्ये पुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते.
या सर्व गोष्टी लक्षात घेऊन काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी ( २६ जुलै) कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना सविस्तर पत्र पाठवून अलमट्टीतील पाण्याचा विसर्ग वाढवण्याबाबत विनंती केली होती .
त्याचबरोबर विधान परिषदेतही याबाबत प्रश्न उपस्थित करून अलमट्टीतील होणारा पाण्याचा विसर्ग वाढवावा, अशी मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरणातून होणारा विसर्ग कर्नाटक सरकारने वाढविला. बुधवारी २६ जुलै अलमट्टी धरणातून १५ हजार क्यूसेक्स इतका विसर्ग होत होता तो तो आज गुरुवार २७ जुलैपर्यंत पावणेदोन लाख क्यूसेक्स इतका करण्यात आला.
त्यामुळे राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडे होऊन सुद्धा पंचगंगेची पाणी पातळी अत्यंत संथपणे वाढत होती.त्यामुळेच गुरुवारी रात्री नऊ वाजेपर्यंत पंचगंगा पाणी पातळी ४० फूट ८ इंचापर्यंतच गेली.
या सर्व गोष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच सांगली जिल्ह्यातील नागरिकांना पुरापासून दिलासा मिळाला आहे.