ऑनलाईन सेवांचा विस्तार करा; नागरिकांना घरी बसूनच सेवा मिळाल्या पाहिजेत : राज्य आयुक्त सुधाकर तेलंग
schedule14 Jul 26 person by visibility 102 categoryमहानगरपालिका
◼️कोल्हापूर महापालिकेचे ऑनलाईन सेवेमध्ये काम समाधानकारक
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य सेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांनी आज कोल्हापूर महानगरपालिकेला भेट देऊन महापालिकेकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांचा सविस्तर आढावा घेतला.
महापालिकेचे ऑनलाईन सेवांमधील काम समाधानकारक असल्याचे सांगत, उर्वरित ऑफलाईन सेवाही लवकरात लवकर ऑनलाईन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
महापालिकेच्या ताराराणी सभागृहात आयोजित बैठकीत आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांनी स्लाईड प्रेझेंटेशनद्वारे महापालिकेच्या डिजिटल सेवांची माहिती सादर केली. प्रस्तुतीकरणात महापालिकेकडून एकूण ६८ सेवा उपलब्ध असून त्यापैकी ५२ अधिसूचित सेवांमध्ये ४२ सेवा ऑनलाईन तर १० सेवा ऑफलाईन असल्याची माहिती देण्यात आली.
तसेच १६ सेवा अधिसूचित नसलेल्या आहेत. पाणीपट्टीचे स्पॉट बिलिंग व वसुली, व्हॉट्सॲप चॅटबॉट सुविधा, ऑनलाईन करभरणा, किऑस्क यंत्रणा तसेच नागरी आरोग्य केंद्रांच्या सेवांबाबतही माहिती देण्यात आली.
यावेळी राज्य आयुक्त सुधाकर तेलंग म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाचा मुख्य उद्देश नागरिकांना शासनाच्या सेवा विहित मुदतीत आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देणे हा आहे.
नागरिकांना शासकीय कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता भासू नये त्यांनी घरी बसून ऑनलाईन अर्ज करावा आणि त्याचे उत्तरही ऑनलाईनच मिळावे, अशी व्यवस्था उभी करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ऑनलाईन सेवांच्या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेचे कामकाज समाधानकारक असल्याचे सांगून केवळ सेवा (अर्ज) ऑनलाईन न करता ते नोटिफाय करावे तसेच ऑनलाइन अर्जामध्ये त्रुटीच निघू नयेत याची संबंधित विभागाने दक्षता घ्यावी. ऑनलाइन अर्जाच्या अनुषंगाने नागरिकांच्या प्रतिसादाबाबत महापालिकेमध्ये अभिप्राय कक्ष सुरू करण्यात यावा. उर्वरित ऑफलाईन सेवाही तातडीने डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून द्याव्यात. तसेच ऑनलाईन सेवांबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात येणा-या सुविधा व महापालिकेकडून देण्यात येणा-या ऑनलाईन सुविधा सर्व सेवा केंद्रातनू देता येते का ते पहावे अशा सूचना केल्या.
आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी सांगितले की, सध्या ऑफलाईन असलेल्या सेवांना टप्प्याटप्प्याने ऑनलाईन करण्यात येईल. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात येणा-या सुविधा व महापालिकेकडून देण्यात येणा-या सुविधा या एकत्रित त्यांच्या व आमच्या नागरी सुविधा केंद्रांद्वारे उपलब्ध करून देता येतील का याची पडताळणी केली जाईल. तसेच सर्व विभागप्रमुखांनी ऑनलाईन प्राप्त होणाऱ्या अर्जांवरील निर्णय विहित मुदतीत घेण्याबाबत दर आठवड्याला आढावा घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.
यांनंतर त्यांनी महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्रास भेट देऊन कामकाजाची सविस्तर माहिती घेतली.
यावेळी उप-सचिव अनुरधा खानविलकर, कक्ष अधिकारी अनुक्रमे रंजना गवारी, शिल्पा पुरोहित, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त राम काटकर, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, निवास पोवार, अरुणकुमार गवळी, उपशहर रचनाकार एन.एस.पाटील, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, रवका अधिकारी प्रशांत पंडत, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंह रजपूत, परवाना अधिक्षक अशोक यादव, सहा.अभियंता अमित दळवी, कनिष्ठ अभियंता, अभिलाषा दळवी, पदमल पाटील उपस्थित होते.