बारावीची ८ तर दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरु
schedule22 Sep 26 person by visibility 97 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) लेखी परीक्षा सोमवार, ८ फेब्रुवारी ते मंगळवार, १६ मार्च २०२७ या कालावधीत, तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) लेखी परीक्षा सोमवार, १५ फेब्रुवारी ते गुरुवार, ११ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे.
बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा बुधवार, २० जानेवारी ते शनिवार, ६ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येणार आहेत.
दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा गुरुवार, २८ जानेवारी ते शनिवार, दि. १३ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येतील.
शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील परीक्षेचा ताण कमी व्हावा, या उद्देशाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच लेखी परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली आहे.