रुईकर कॉलनी व शिवाजी पेठ येथील नागरी आयुष्मान केंद्रांचा प्रारंभ
schedule30 Sep 24 person by visibility 337 categoryआरोग्य
कोल्हापूर : शहरातील गोरगरीबांना चांगल्या आरोग्य सेवा, सुविधा देण्यासाठी महापालिकेच्यावतीने नव्याने सुरु केलेल्या दोन नागरी आयुष्मान केंद्राचा प्रारंभ आज खासदार धनंजय महाडीक यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम रुईकर कॉलनी येथील चांदणेनगर व शिवाजी पेठ येथील कोरल अपार्टमेंट येथे घेण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम, माजी नगरसेविका सौ.उमा इंगळे आदी उपस्थित होते. या शुभारंभ प्रसंगी पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांचा नियोजित कार्यक्रम असलेने ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी लेखी संदेश द्वारे या नागरी आयुष्मान केंद्रास शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी खासदार धनंजय महाडीक यांनी बोलताना या नागरी आयुष्मान केंद्रामार्फत नागरीकांवर मोफत औषधोपचार केला जाणार आहे. त्यामुळे खाजगी दवाखान्यावर नागरिकांचा होणारा खर्च कमी होईल. नागरीकांना सर्व सेवा सुविधा या केंद्रामार्फत मिळणार असून शासनाच्या योजना चांगल्या पध्दतीने राबवा व नागरीकांना चांगल्या पध्दतीने या योजनेचा लाभ द्या असे आवाहन करुन या नागरी आयुष्मान केंद्राला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपायुक्त पंडित पाटील, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, उपशहर अभियंता रमेश कांबळे, आरसीएचचे नोडल ऑफिसर डॉ.अमोलकुमार माने, वैद्यकिय अधिकारी डॉ.संजना बागडी, डॉ.योगिनी कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता उमेश बागुल, चांदणेनगर सोसायटीचे चेअरमन सौ.निर्मलाराजे देशमुख, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडील व आयुष्मान केंद्राकडील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, आशा स्वयंसेविका व भागातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.