हिवाळी अधिवेशनात न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनश्रेणीचा प्रश्न मांडणार; सतेज पाटील : न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संपाला काँग्रेसचा पाठिंबा
schedule18 Nov 26 person by visibility 125 categoryराज्य
कोल्हापूर : हिवाळी अधिवेशनात न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनश्रेणीचा प्रश्न मांडणार असून न्यायालयातील रिक्त पदे त्वरित भरण्याबाबतही आवाज उठवणार असल्याची ग्वाही काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी कर्मचारी संघटनेला दिली.
सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात यावी आणि न्यायालयातील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत, यासह अन्य मागण्यांसाठी मंगळवारपासून राज्यभरातील वर्ग ३ च्या न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला आहे. कोल्हापुरातही न्यायालयाच्या बाहेर संपकरी कर्मचारी ठिय्या मारून बसले आहेत. दरम्यान, बुधवारी दुपारी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट देत कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी फोनवरून आमदार सतेज पाटील यांच्याशी संपर्क साधत कर्मचाऱ्यांशी त्यांचे बोलणे करून दिले. आमदार सतेज पाटील यांनी यासंदर्भात आपण आगामी हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडू, अशी ग्वाही देत न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संपाला काँग्रेसचा पाठिंबा जाहीर केला.
यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी जात काँग्रेसचा न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तसेच, कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेश पाटील यांच्याशी संवाद साधला. यावेळी आमदार सतेज पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आणि संपकरी कर्मचाऱ्यांचे बोलणे करून दिले. आमदार पाटील यांनी येत्या हिवाळी अधिवेशनात न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनाचा प्रश्न उपस्थित करू, अशी ग्वाही दिली. यावेळी काँग्रेसचे कोल्हापूर महापालिकेतील गटनेते इंद्रजीत बोंद्रे, जिल्हा परिषद गटनेते एकनाथ पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष व नगरसेवक प्रवीण केसरकर, जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, नगरसेवक सचिन चौगुले, कॉम्रेड दिलीप पोवार, सतीशचंद्र कांबळे, संदीप बिरांजे, श्रीराम सेवा संस्थेचे सभापती विलास वाडकर, उपसभापती मारुती पाटील, संचालक युवराज उलपे, राहुल सावंत, मोहन सालपे, सागर येवलुजे, तानाजी लांडगे यांच्यासह नगरसेवक आणि काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.