5 फेब्रुवारी रात्री 10 पासून जमावबंदी; प्रचार संपुष्टात येणार
schedule04 Feb 26 person by visibility 81 categoryराज्य
कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी विनिर्दिष्ट ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या मतदारसंघासाठी शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर म्हणजेच 5 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजल्यानंतर प्रचार करता येणार नाही किंवा सभा घेता येणार नाही.
त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघ कार्यक्षेत्रात 5 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते मतदानादिवशी 7 फेब्रुवारी रोजी मतदान संपेपर्यंत बेकायदेशीर जमाव जमवणे, सार्वजनिक सभा, बैठका घेणे तसेच पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येणे अशी कृत्ये करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघ क्षेत्रात मतदान संपेपर्यंत खालील कृती करण्यास मनाई केली आहे.
बेकायदेशीर जमाव जमविणे आणि सार्वजनिक सभा, बैठका घेणे अगर निवडणूक प्रचार करणे. तसेच पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येणे. (पूर्व नियोजित सामाजिक व धार्मिक कार्यक्रम वगळून व राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व निवडणूक कामाशी निगडित कर्मचारी वगळून.) या आदेशाचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास, ती व्यक्ती भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.