जाहिरात परवानगीसाठी सोमवार दुपारपर्यंतच मुदत; प्रचार समाप्तीनंतर जाहिरातींना बंदी
schedule10 Jan 26 person by visibility 145 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने 'माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती माध्यम कक्ष' (मीडिया कक्ष) स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष बागल मार्केट, राजारामपुरी येथील नगररचना विभाग कार्यालयाशेजारी कार्यरत आहे.
जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या तारखेच्या पाच दिवस आधीपर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तसेच, प्रचार कालावधी १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजता संपत आहे. त्यामुळे विहित वेळेत अर्ज मंजुरी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सोमवार, दि. १२ जानेवारी रोजी दुपारी २:०० वाजेपर्यंतच अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे निवडणूक कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
* प्रचार समाप्तीनंतर जाहिरातींना बंदी
महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराची मुदत १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता संपणार असल्याने, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांसह अन्य कुठल्याही प्रसारमाध्यमांद्वारे निवडणूकविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी यापूर्वीच दिली आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान होणार आहे. संबंधित अधिनियमातील तरतुदींनुसार मतदान समाप्तीच्या ४८ तास आधी, म्हणजे १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता जाहीर प्रचाराची मुदत संपेल. त्यानंतर प्रसारमाध्यमांतून कुठल्याही प्रकारची जाहिरात प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नाही.
त्यामुळे जाहीर प्रचाराच्या समाप्तीनंतर मुद्रित माध्यमांचा जाहिरातीच्या पूर्वप्रमाणनाचा किंवा परवानगीचा प्रश्न उद्भवत नाही. यासंदर्भातील सविस्तर बाबी राज्य निवडणूक आयोगाच्या ९ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या 'निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश, २०२५' मध्ये नमूद केल्या आहेत.

