विकलांग व्यक्तींची स्वतःशी, समाजाशी दुहेरी लढाई : माहेश्वरी
schedule04 Jan 25 person by visibility 232 categoryसामाजिक
कोल्हापूर : विकलांग व्यक्तींना आर्थिक, सामाजिक सक्षमीकरण व कौशल्यपरक शिक्षण देणे गरजेचे असून त्यांची स्वतःशी व समाजाशी अशी दुहेरी लढाई सुरू असल्याचे मत हिंदीचे प्रसिद्ध विकलांग अभ्यासक डॉ. सुरेश माहेश्वरी यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या निलांबरी सभागृहात हिंदी-इंग्रजी विभाग व अखिल भारतीय विकलांग चेतना परिषद (छत्तीसगड) यांच्या संयुक्त विद्यमाने विकलांग विमर्शच्या संदर्भात भाषा आणि साहित्य या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात ते शनिवारी बोलत होते. यावेळी छत्तीसगड उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ति डॉ. चंद्रभूषण वाजपेयी यांनी विकलांगांना सामाजिक सुरक्षा देणे प्रत्येक सकलांग व्यक्तीचे कर्तव्य असल्याचे नमूद केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी हिंदी विभाग प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी होत्या.
पहिल्या सत्रात दिल्ली विद्यापीठातील डॉ. प्रीति गच्चे यांनी विचार मांडले. अध्यक्षस्थानी डॉ. ए. एम. सरवदे होते.
समापन समारंभाचे प्रमुख पाहुणे हिंदी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. साताप्पा सावंत यांनी विकलांग व्यक्तींकडे सामाजिक दृष्टीकोण बदलण्याची आवश्यकता व्यक्त केली. अध्यक्षस्थानी मानव्यशास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. एस. देशमुख उपस्थित होते. त्यांनी विकसित भारताच्या निर्मितीसाठी व नवीन शैक्षणिक धोरण्यात विकलांगांना विशेष स्थान देण्यात आल्याचे सांगितले. पाहुण्यांची ओळख डॉ. प्रकाश मुंज यांनी करून दिली.
आभार समन्वयक डॉ. मनोहर वासवानी यांनी मांडले. सूत्रसंचालन डॉ. जयसिंग कांबळे, मृणाल मोहिते, डॉ. प्रकाश निकम यांनी केले. यावेळी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. प्रभंजन माने, डॉ. चंद्रकांत लंगरे, डॉ. राजश्री बारवेकर, प्रा. दीपक भादले, डॉ. संतोष कोळेकर, डॉ. सुरेंद्र उपरे यांच्यासह देशभरातून शंभरहून अधिक विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.