कोल्हापुरात सामाजिक उपक्रमाचा वस्तुपाठ: ६० गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप
schedule07 Jul 26 person by visibility 98 categoryसामाजिक
◼️शिवसेना वर्धापन दिन व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम
कोल्हापूर : शिक्षण हेच खऱ्या अर्थाने समाजाच्या प्रगतीचे साधन आहे. याच विचारातून, शिवसेना पक्षाच्या ६० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त, प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, कोल्हापूर येथे एक प्रेरणादायी उपक्रम पार पडला. योगेश साळोखे यांच्या पुढाकारातून शहरातील ६० गरजू व होतकरू विद्यार्थिनींना शालेय साहित्य, वॉटर बॉटल, टिफीन बॉक्स, रेनकोट आणि शालेय गणवेशांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचा शुभारंभ विनायकराव साळोखे आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक अश्किन आजरेकर, विश्वास साळोखे, अजित मोरे, बाळासाहेब पाटील, महेंद्र साळोखे, किरण काखंडकी, रजनीकांत वडगावकर यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सविता पाटील यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात ज्ञानाच्या महत्त्वाची मांडणी केली. त्या म्हणाल्या, "शिक्षणासारखे दुसरे अमृत नाही आणि ज्ञानासारखा दुसरा प्रकाश नाही. आज विद्यार्थिनींना देण्यात आलेले हे साहित्य केवळ वस्तू नसून, त्यांच्या स्वप्नांना दिलेली नवी ऊर्जा आहे. या संधीचे सोने करून मुलींनी शिक्षणाच्या जोरावर सक्षम व्हावे आणि भविष्यात समाजासाठी योगदान देण्याची भावना जोपासावी."
प्रमुख अतिथी विनायकराव साळोखे यांनी विद्यार्थिनींचे मनोबल वाढवताना सांगितले की, "शालेय जीवनातील प्रामाणिक परिश्रम, जिद्द आणि शिक्षणाप्रती असलेली तळमळ हाच यशाचा पाया आहे. आजच्या या विद्यार्थिनींतूनच उद्याच्या सक्षम लोकप्रतिनिधी, समाजनेत्या तसेच राणी लक्ष्मीबाई आणि महाराणी ताराबाईंसारख्या कर्तृत्ववान स्त्रिया घडतील."
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे सचिव प्रभाकर एस. हेरवाडे यांनी भूषवले. त्यांनी समाजातील दानशूर व्यक्तींच्या योगदानाचे कौतुक केले. साळोखे परिवार आणि उपस्थित मान्यवरांच्या मदतीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री कलकुटकी यांनी केले, तर उपमुख्याध्यापक रत्नाकर घाटगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
> "शिक्षण हीच खरी संपत्ती आहे; विद्यार्थ्यांच्या हातात शालेय साहित्य देणे म्हणजे त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया अधिक भक्कम करणे होय."