डॉ. तारा भवाळकर या प्रागतिक स्त्रीवादी संशोधक, साहित्यिक; कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांचे गौरवोद्गार; विद्यापीठाच्या वतीने केला सत्कार
schedule13 Oct 24 person by visibility 255 categoryसामाजिक
कोल्हापूर : मराठी भाषेला अभिजात दर्जा घोषित झाला असतानाच डॉ. तारा भवाळकर यांच्यासारख्या प्रागतिक स्त्रीवादी संशोधक-साहित्यिकेची नवी दिल्ली येथे नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे हा अत्यंत चांगला संकेत असल्याचे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी काल (दि. १२) सांगली येथे काढले.
नवी दिल्ली येथे होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक, संशोधक व समीक्षक असलेल्या डॉ. तारा भवाळकर यांची नुकतीच निवड करण्यात आली. त्या निमित्ताने आज कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि ग्रंथभेट देऊन शिवाजी विद्यापीठाच्या वतीने अभिनंदन व सत्कार केला. त्यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, मराठी साहित्य संमेलनाच्या शतकभराच्या वाटचालीमध्ये अवघ्या सहा महिलांना अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. त्यामध्ये डॉ. भवाळकर यांचा समावेश झाला, ही अतीव अभिमानाची बाब आहे. त्यातही नवी दिल्ली येथे यापूर्वी झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ तत्त्वज्ञ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी भूषविले होते. त्यानंतर आता डॉ. भवाळकर या देशाच्या राजधानीमधून जगभरातील मराठी भाषिकांना आपल्या अध्यक्षीय भाषणाद्वारे संबोधित करतील, ही मराठी भाषेच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना ठरेल.
डॉ. भवाळकर यांनी शिवाजी विद्यापीठाशी माझा खूप जुना स्नेह आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठ परिवाराच्या वतीने कुलगुरूंनी केलेला गौरव हा मला माझ्या कुटुंबियांनीच केला आहे, अशी आपली भावना असल्याचे कृतज्ञतापर उद्गार काढले.
यावेळी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. अविनाश सप्रे उपस्थित होते.