कोल्हापूर शहरातील पाणी प्रश्नावर श्वेतपत्रिका काढा : 'आप'चे प्रशासकांना निवेदन
schedule30 Apr 25 person by visibility 127 category

कोल्हापूर : शहराला पाणीपुरवठा करणारी थेट पाईपलाईन योजना, तसेच गरजेच्या वेळी उपयोगात यावी म्हणून राखीव ठेवलेली शिंगणापूर योजना या दोन्ही योजनांमध्ये वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे गेल्या वर्षभरापासून शहरात पाणीबाणी सारखी परिस्थिती वारंवार उद्भवत आहे.
तसेच पाणी वितरण यंत्रणेत असलेल्या अडचणी गेले अनेक वर्षे सोडवल्या गेल्या नाहीत. परिणामी दोन-दोन योजना असून देखील शहर वासियांना अपुरा पाणीपुरवठा होत आहे.
एकीकडे 90 MLD इतकी गरज असताना 250 MLD इतका प्रचंड पाणी उपसा महापालिकेकडून सुरु आहे. यामुळे पाण्यावर अनावश्यक खर्च होत आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेतील यंत्रणेला तसेच शहरातील नागरिकांना याची वस्तुस्थिती माहित असणे गरजेचे आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील पाणी प्रश्नावर श्वेतपत्रिका काढवी अशी मागणी आम आदमी पार्टीने प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यामध्ये अमृत 1 व अमृत 2 योजनांच्या कामाची सध्यस्थिती, योजनेतून केलेल्या बारा टाक्या, संप, क्रॉस कनेक्शन व कार्यान्वित यंत्रणा, थेट पाईपलाईन योजनेतील अडचणी, जसे की ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन मध्ये वारंवार बिघाड होणे, बिल न मिळाल्याने कन्सल्टंट कंपनीकडे दिलेल्या जबाबदाऱ्या पार न पाडणे, योजनेच्या हार्डवेअर सॉफ्टवेअर मध्ये बिघाड झाल्यास त्याचा ऍक्शन प्लॅन असणे, शहरांतर्गत पाणी वितरण व्यवस्थेतील अडचणी, पाणीपुरवठा बंद पडल्यास टँकर द्वारे केले जाणारे नियोजन, शहरातील अनेक ठिकाणी असणारी मोठी गळती, पाणी बिल वसुलीत येणाऱ्या अडचणी, अनधिकृत कनेक्शन शोध मोहिमेसाठी करत असलेल्या उपाययोजना. या सर्व मुद्यांना अंतरभूत करून श्वेतपत्रिका काढल्यास त्यावर काम करणे सोपे होईल. त्यामुळे प्रशासकांनी ही श्वेतपत्रिका काढण्यास मान्यता देऊन पाणी प्रश्न सोडवावी अशी मागणी आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली.
यावेळी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी थेट पाईपलाईन योजनेतील विद्युत लाईन अंडरग्राऊंड करण्यासाठी प्रस्ताव शासनाला सादर केला आहे, शिंगणापूर योजना सक्षम करून थेट पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यास पर्याय म्हणून वापर करण्याचे नियोजन केल्याचे सांगितले. आप पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांवर कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासकांनी जल अभियंता हर्षजीत घाटगे यांना दिल्या.
यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, दुष्यंत माने, सचिन पाटील आदी उपस्थित होते.