SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळच्या नूतन संचालक मंडळाचा पाटील कुटुंबीयांच्या वतीने सत्कार८३ व्या वर्षीही अखंड भाषासेवा!पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना ९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादनकोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन आंतरराष्ट्रीय तोतरेपणा जनजागृती दिन: समज, स्वीकृती आणि संवादघरफाळा थकबाकीदारांच्या 2 व्यावसायिक आस्थापना सीलक्षयरोगाचे प्रसारमार्ग, लवकर निदान व मोफत उपचारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीकेडीसीसी बँकेकडून संस्थांना डिव्हीडंड पोटी ३१ कोटी रुपये अदा; कर्मचाऱ्यांना बोनस व अर्धा पगार बक्षीसपोटी १२ कोटी अदाडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या दोन विद्यार्थ्यांना ‘टॉप २५ ॲम्बेसेडर’मध्ये स्थानइचलकरंजीत कौस्तुभ गावडे यांना वाढता पाठिंबा; शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण!

जाहिरात

 

८३ व्या वर्षीही अखंड भाषासेवा!

schedule22 Oct 26 person by visibility 61 categoryसामाजिक

◼️लेखिका वर्षा गगराणी यांचे १४ पुस्तकांचे प्रकाशन संपन्न

कोल्हापूर: मराठी साहित्याचा समृद्ध वारसा हिंदी भाषिक वाचकांपर्यंत पोहोचवणाऱ्या ज्येष्ठ लेखिका वर्षा गगराणी  यांनी मराठीतून हिंदीमध्ये अनुवादित केलेल्या तब्बल १४ पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दामोदर खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. वयाच्या ८३ व्या वर्षीही त्यांचा भाषेवरील व्यासंग आणि साहित्य निर्मितीची ऊर्जा थक्क करणारी असून, ग्रंथाली व राजकमल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात त्यांच्या या अमूल्य प्रवासाचा गौरव करण्यात आला.

कोल्हापुरातील रेसिडेन्सी क्लब येथे उत्साहात संपन्न झालेल्या कार्यक्रमास संपादक हुबनाथ पांडे,  अशोक माहेश्वरी, रमन मिश्र, राकेश शर्मा, अरुण पुराणिक, संजय पाटील, अशोक गगराणी, भुषण गगराणी, डॉ. कविता गगराणी, डॉ. सुनिलकुमार लवटे ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, कार्यक्रमाचे संयोजक धनश्री धारप यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

 डॉ. दामोदर खडसे म्हणाले, मला कोल्हापूरपासून नेहमीच प्रेरणा मिळते. लेखिका वर्षा गगराणी यांनी वयाच्या ८३ व्या वर्षीही केलेले पुस्तकांचे भाषांतर अत्यंत उल्लेखनीय आहे. मराठीतून हिंदीत भाषांतर करताना प्रतिभेचा कस लागतो. मराठी शब्दाला हिंदीत योग्य पर्यायी शब्द शोधून लिहिताना खूप काळजी घ्यावी लागते. अनुवादक हा दोन भाषा आणि संस्कृतींमधील 'नाविक' असतो, जो विचार आणि साहित्य एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत पोहोचवतो. अनुवादात मूळ भाषेचा भाव, संस्कृती आणि भावनिक खोली अचूकपणे उतरवणे हे मोठे आव्हान असते. ज्या अनुवादात मूळ मजकुरातून काहीही वगळले जात नाही आणि स्वतःहून काहीही वाढवले जात नाही, तोच खरा आणि परिपूर्ण अनुवाद ठरतो.

साहित्य हे माणसाच्या अंतर्मनात कायमस्वरूपी सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. हिंदी ही देशाची केंद्रीय भाषा असल्याने मराठी साहित्य देशभरात पोहोचिण्यासाठी ती प्रभावी ठरते. याचे उत्तम उदाहरण देत असताना दया पवार यांच्या 'बलुतं' पुस्तकाच्या आठवणी आणि त्याचे हिंदीत झालेले स्वागत, ज्यामुळे त्यांना देशभरात मिळालेली ओळख याबाबत त्यांनी विवेचन केले.

याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना अनुवादिका वर्षा गगराणी म्हणाल्या, प्रत्येक स्त्रीचे जीवन एका कादंबरीसारखे असते. आपल्या प्रवासात कुटुंबाचे योगदान सर्वात महत्त्वाचे आहे. यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील चढ-उतार आणि साहित्य प्रवासाचा सविस्तर पट उपस्थितांसमोर मांडला. घरातील आणि बाहेरील जबाबदारी पार पाडताना स्त्रियांना पुरषांच्या आणि पुरुषांना स्त्रियांची गरज असते असेही त्यांनी यावेळी सांगितले. आपल्या कुटुंबाला कोल्हापूरात ६१ वर्षे पूर्ण झाली आहे. विशेषत हा लक्ष्मीपूरीत राहत असतानाचे घर मालक, शेजारी मित्र मंडळी, स्नेही यांच्याकडून मिळालेला आधार व सहकार्य या बदल कृतज्ञता व्यक्त केली.  बदलत्या काळानुसार स्त्रियांनी थोडे तरी आर्थिक स्वातंत्र राखले पाहिले आणि स्वत:च्या मर्जीने काही पैसे खर्च केले पाहिजे हा विचारही त्यांनी मांडला.

संजय पाटील यांनी आपल्या मनोगतात 'ग्रंथाली' चळवळीच्या आठवणींना उजाळा दिला.  'ग्रंथाली'च्या सुरुवातीच्या काळात विजय तेंडुलकर, कुमार केतकर, रवींद्र लागू, अरुण साधू आणि दिनकर गांगल यांच्यासोबत काम करताना एसटी बसच्या छतावर पुस्तकांचे गठ्ठे चढवल्याचे त्यांनी सांगितले. 

मुंबई विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे माजी प्रमुख डॉ. हुबनाथ पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली चार हिंदी चित्रपटांचे लेखन व संवाद पूर्ण केल्याचा उल्लेख त्यांनी केला. भाषणाच्या शेवटी अरुण कोलटकर, दासू वैद्य आणि अरुण काळे यांच्या कविता विषयक विचारांचा संदर्भ देण्यात आला; विशेषतः "माणसं भंगारात जाऊ नयेत म्हणून कविता लिहितात," या अरुण काळेंच्या विधानाने वक्तव्याचा समारोप करण्यात आला.

लेखक अरुण पुराणिक यांनी देवानंद यांचा 'हम दोनों' चित्रपट पाहिल्यानंतर सिनेमाच्या प्रेमात पडल्याची आणि गिरगावातील शाळेच्या दिवसांत नियमित चित्रपट पाहिल्याची आठवण त्यांनी सांगितले.  वडिलांनी दिलेल्या सल्ल्यानुसार कलावंतापेक्षा एक चांगला प्रेक्षक आणि श्रोता बनून, गाणी आणि चित्रपटांचा अभ्यासपूर्ण व शास्त्रशुद्ध दृष्टिकोनातून विश्लेषण करण्याची सवय अंगीकारली.  भारतीय चित्रपटसृष्टीची पाळेमुळे मुंबईत असली, तरी ती खरी बहरली आणि फुलली ती कोल्हापुरात बाबुराव पेंटर, व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर यांच्या योगदानाचा आणि ऐतिहासिक चित्रपटांत वापरल्या गेलेल्या तांग्याच्या घोड्यांच्या वैशिष्ट्यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. 

डॉ. हुबनाथ पांडे म्हणाले,  वर्षा गगराणी यांच्या भाषेवरील प्रभुत्वाची प्रशंसा करताना सांगितले, हिंदी ही सुमारे २०० वर्षांची भाषा आहे, तर मराठीला तब्बल बाराशे वर्षे जुनी समृद्ध परंपरा आहे. मराठी भाषेचे साहित्यातील योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. वयाच्या ८० व्या वर्षीही वर्षा गगराणी यांनी मराठीतील उत्कृष्ट कृतींचा हिंदीत अनुवाद करून दोन्ही भाषांमधील संवादाचा पूल बांधला आहे.

रमन मिश्र म्हणाले, वर्षा गगराणी यांनी अनुवाद क्षेत्रात केलेले कार्य हिंदी भाषिक वाचकांसाठी मराठी साहित्य अधिक सुलभ आणि समृद्ध करणारे ठरेल. त्यांच्या या उपक्रमातून आणि ऊर्जेतून आम्हा सर्व प्रकाशकांना नवीन प्रेरणा मिळाली आहे.

राकेश शर्मा म्हणाले, हा लोकार्पण सोहळा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. वर्षा गगराणींनी केलेले भाषांतराचे काम हिंदी वाचकांसाठी ज्ञानाची आणि मनोरंजनाची नवी कवाडे उघडून देईल.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. मृण्मयी भजक यांनी केले. या कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes