उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत शिक्षण महर्षी आणि अजातशत्रू, थोर व्यक्तीमत्व हरपल्याची भावना केली व्यक्त
schedule05 Aug 26 person by visibility 125 categoryराज्य
कोल्हापूर : ज्येष्ठ शिक्षण महर्षी आणि राजकारणासह सहकार, क्रीडा, कृषी सामाजिक अशा विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांचे मंगळवारी निधन झाले. कसबा बावडा येथील यशवंत निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, वनमंत्री गणेश नाईक, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, आदी मान्यवरांनी दर्शन घेतले व आदरांजली वाहिली. ज्ञानाचा सागर, शिक्षण महर्षी, अत्यंत विद्वान, कृषी, सहकार, वैद्यकीय शिक्षण या सारख्या विविध क्षेत्रात ऊतुंग कामगिरी करणारे थोर अजातशत्रू असणारे थोर व्यक्तिमत्व आपल्यातून हरवल्याची भावना सर्वांनीच यावेळी व्यक्त केली.
यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज डी. पाटील, डॉ. विजय डी पाटील, डॉ.अजिंक्य डी पाटील, डॉ. श्री. उद्धव पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, डॉ. पी. डी. पाटील यांच्यासह कौटुंबिक सदस्य उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी आपल्या जीवनात शिक्षण, समाजकारण, वैद्यकीय क्षेत्र, सहकार, क्रीडा, कृषी, अशा विविध क्षेत्रात भरीव काम केले. त्यांचे कार्य महाराष्ट्र आणि संपूर्ण देश कधीही विसरू शकणार नाही. सर्वसामान्यांच्या दुःखात समरस होणारे हे व्यक्तिमत्व होते. त्यांचे जाणे हे सर्वांसाठी दुःखद आणि वेदनादायी आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आणि पद्मश्री डी. वाय. पाटील साहेबांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या रूपाने आपण ज्ञानाचा महासागर, शिक्षण महर्षी, आजातशत्रू लोकनेता हरपला आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांची आणि आपली ओळख जवळपास 40 वर्षाहून ही जुनी आहे असे सांगून विविध पदांवरील काम करण्याचा त्यांना जो कार्यकाल मिळाला त्यामध्ये त्यांनी देशाच्या, महाराष्ट्राच्या आणि कोल्हापूरच्या प्रगतीसाठी अखंड प्रयत्न केले. राजकारणात इतकी थोर व्यक्तिमत्वे फार कमी प्रमाणात आढळतात. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी असून त्यांना ईश्वर सांत्वना देवो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, पद्मश्री डी. वाय. पाटील साहेबांचे पूर्ण आयुष्य हे अतिशय मोठ्या संघर्षाची यशोगाथा आहे. गरिबांची मुलेही कमी पैशांमध्ये डॉक्टर, इंजिनिअर झाली पाहिजेत या तळमळीतून शिक्षण क्षेत्रात उत्तुंग काम त्यांनी राज्यात आणि राज्याबाहेर केले आहे. अत्यंत धाडसी, अतिशय संघर्ष करणारा योध्दा अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राने फार मोठ्या कर्तुत्ववान नेत्याला गमावले आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
चंद्रकांत (दादा) पाटील म्हणाले, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील हे नाव महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला परिचयाचे आहे. स्व. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना विनाअनुदानित महाविद्यालयाचा निर्णय केल्यानंतर ज्या काहींनी इंजिनिअरिंग, मेडिकलसहित वेगवेगळ्या फॅकल्टीची महाविद्यालये उभी केली आणि यशस्वीपणे चालवली त्यात त्यांचा समावेश आहे. आता पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेची आठ विद्यापीठे आणि जवळपास ३०० महाविद्यालये इतका मोठा व्याप आहे. त्यामुळे स्व. वसंतदादांच्या विनाअनुदानित तत्त्वाला अनुसरून प्रचंड मोठा शैक्षणिक व्याप यशस्वीपणे वाढवणारे डी. वाय. पाटील होत. एक यशस्वी जीवन डी. वाय. दादा जगले.
कुटुंबियांचे सांत्वन करुन वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, डॉ. डी. वाय. पाटील साहेबांचे व्यक्तीमत्व अत्यंत उत्तुंग आहे. अतिशय श्रमाने आणि आपुलकीनं त्यांनी लोकांना प्रेम दिलं. म्हणूनच त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळत आहे. महाराष्ट्राच्या ह्दयात त्यांच्या आठवणी कायम राहतील. त्यांचा वारसा त्यांची मुले निश्चितपणे अतिशय प्रकाशमान करतील, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, पद्मश्री डी. वाय. दादांचे आणि माझे संबंध राजकारणाच्या पलीकडचे अतिशय कौटुंबिक होते. डी. वाय. दादा जाऊन जशी पाटील कुटुंबाची हानी झालेली आहे, तसेच महाराष्ट्राचे देखील नुकसान झाले आहे. त्यांच्या अनेक भेटी आपल्या स्मरणात आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी समाजकारण केले, शिक्षणामध्ये काम केले ते अत्यंत मोलाचे आहे. एक फार मोठं व्यक्तिमत्त्व आज महाराष्ट्राच्या राजकारणातून, समाजकारणातून आणि शिक्षण क्षेत्रातून निघून गेले आहे, याचं फार मोठं दुःख आम्हाला सगळ्यांना आहे.
खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटलांच्या निधनाने महाराष्ट्राची आणि सर्व समाजाचीच अत्यंत हानी झाली आहे. त्यांनी उत्तम कार्य केले आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात तर अनेक इन्स्टिट्यूशन (संस्था) त्यांनी निर्माण केल्या. त्यामुळे बहुजन समाजातली अनेक मुले-मुली शिकली व समाजाला आधार ठरली. छत्रपती घराण्याचा आणि डी. वाय. पाटील घराण्याचा स्नेह वर्षानुवर्ष दृढ असल्याचेही त्यांनी सांगितले.
माजी केंद्रीय गृहमंत्री आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, महापौर रूपाराणी निकम, आमदार सर्वश्री अंबादास दानवे, जयंत आसगावकर, जयंत पाटील, डॉ. विश्वजित कदम, अमित देशमुख, राजेंद्र पाटील-यड्रावकर, अमल महाडिक, शिवाजी पाटील, राहूल आवाडे, चंद्रदीप नरके, माजी मंत्री सर्वश्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, माजी खासदार संजय मंडलिक, निवेदिता माने, छत्रपती संभाजी महाराज, माजी आमदार सर्वश्री सुरेश हाळवणकर, मालोजीराजे, राजू आवळे, राजीव आवळे, अभिनेता सयाजी शिंदे, भरत जाधव, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आदी मान्यवरांनी दर्शन घेतले व आदरांजली वाहिली. गेले दोन दिवस दर्शनासाठी जनसागर लोटला होता. दोन दिवस सर्व सामान्य नागरिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.