घोडावत विद्यापीठात पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय टेनिस स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न; पुरुष व महिला संघांची अंतिम क्रमवारी जाहीर
schedule12 Jan 26 person by visibility 72 categoryक्रीडा
अतिग्रे : असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (AIU) यांच्या मान्यतेखाली संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर येथे आयोजित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धा अंतिम टप्प्यात पार पडत यशस्वीरीत्या संपन्न झाली. ७ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात व गोवा या राज्यांतील सरकारी, निमसरकारी व स्वायत्त विद्यापीठांमधील पुरुषांचे ३९ आणि महिलांचे २९ संघ सहभागी झाले होते.
🔹पुरुष गटातील अंतिम क्रमवारी –
प्रथम क्रमांक: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
द्वितीय क्रमांक: मणिपाल विद्यापीठ, जयपूर
तृतीय क्रमांक: शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
चतुर्थ क्रमांक: आयटीएम विद्यापीठ, ग्वालियर (मध्यप्रदेश)
🔹महिला गटातील अंतिम क्रमवारी –
प्रथम क्रमांक: गोविंद गुरु ट्रायबल युनिव्हर्सिटी, बांसवाडा
द्वितीय क्रमांक: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
तृतीय क्रमांक: गुजरात विद्यापीठ
चतुर्थ क्रमांक: लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट, ग्वालियर
या स्पर्धेत पात्र ठरलेले सर्व पुरुष व महिला संघ १७ ते २१ जानेवारी २०२६ दरम्यान मणिपाल विद्यापीठ, जयपूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय पुरुष व महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
महिला संघांचे सामने संजय घोडावत विद्यापीठाच्या कॅम्पसमधील टेनिस कोर्टवर, तर पुरुष संघांचे सामने कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन (KDLTA), कोल्हापूर येथे पार पडले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी उत्कृष्ट क्रीडा सुविधा, अनुभवी पंच व्यवस्था व सुयोग्य आयोजन व्यवस्थापन उपलब्ध करून देण्यात आले.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रा. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे तसेच क्रीडा अधिकारी सूर्यजित घोरपडे यांनी सर्व सहभागी संघ, प्रशिक्षक, पंच व आयोजक समितीचे अभिनंदन केले आहे.
पश्चिम विभागीय स्पर्धेतून उदयास आलेल्या प्रतिभावंत खेळाडूंमुळे अखिल भारतीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

