प्लास्टिक, अस्वच्छता व उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर महापालिकेची कारवाई; उपद्रव शोध पथकामार्फत 465 व्यक्तींकडून 3 लाख 72 हजारांचा दंड वसूल
schedule12 Aug 26 person by visibility 213 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : शहरातील प्लास्टिकचा वापर, अस्वच्छता तसेच सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकणाऱ्यां नागरीक व आस्थांपना विरोधात कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या महिनाभरात विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४६५ व्यक्तींवर कारवाई करून ३ लाख ७२ हजार ५५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशानुसार व उपआयुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत आहे.
महापालिकेच्या या कारवाईमध्ये प्लास्टिकचा वापर करणाऱ्या २६५ नागरिक व व्यावसायिकांकडून २ लाख २५ हजार ८०० रुपये, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, लघुशंका व थुंकणाऱ्या १८ व्यक्तींकडून ३८ हजार ७५० रुपये, उघड्यावर कचरा टाकणाऱ्या १७६ नागरिकांकडून १ लाख ६ हजार ५०० रुपये, तर रस्त्यावर खरमाती टाकणाऱ्या ६ नागरिकांकडून १ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शहरातील स्वच्छता अबाधित राहावी, सार्वजनिक ठिकाणी होणारे उपद्रव रोखले जावेत आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जबाबदारीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने महापालिकेच्या आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
यासोबतच महापालिकेने शहरात जनजागृती मोहीमही हाती घेतली असून, नागरिक व व्यावसायिकांना प्लास्टिकचा वापर टाळण्याचे तसेच शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
नागरिक, व्यावसायिक आणि विक्रेत्यांनी आपला दैनंदिन कचरा केवळ महापालिकेच्या अधिकृत घंटागाडीकडेच द्यावा. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर कचरा जाळणे, रस्त्यावर अथवा नाल्यात कचरा टाकणे, तसेच प्लास्टिक वापरासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणे आढळल्यास लागू नियम व संबंधित कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. आवश्यकतेनुसार संबंधितांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात येईल याची संबंधीतांनी नोंद घ्यावी.
शहर स्वच्छ व सुंदर ठेवणे ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचीही सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छता नियमांचे पालन करून महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.