शासन राज्यभरात सुमारे ३ हजार ‘मार्गस्थ निवारे’ उभारणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
schedule17 Apr 26 person by visibility 139 categoryराज्य
🟠 कोल्हापूर जिल्ह्यातील चार सुसज्ज बसस्थानकांचे लोकार्पण
🟠 कोल्हापूर विभागाला १२० नवीन बसेसची घोषणा
🟠 कोल्हापूर विभागात गेल्या दोन वर्षांत २३ पैकी १७ बस स्थानकांचे नूतनीकरण पूर्ण, उर्वरीत स्थानकांना मंजुरी
कोल्हापूर : राज्यभरात सुमारे ३ हजार ‘मार्गस्थ निवारे’ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प शासनाने केला असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील संभाजीनगर, पेठवडगाव, वाठार आणि जयसिंगपूर येथील नूतनीकरण व विस्तारित बसस्थानकांचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ऊन, वारा, पाऊस सहन करत एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांसाठी हे निवारे म्हणजे जणू आधारवड ठरणार आहेत. हे निवारे केवळ उभे राहणार नाहीत, तर ते २४ तास देखभालीखाली, सुसज्ज आणि सजीव असतील. त्याठिकाणी छोटेखानी कॅन्टीनची सुविधा असेल. त्यामुळे महिला बचत गट आणि तरुणांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील.
आज झालेल्या उद्घाटन प्रसंगी ठिकठिकाणी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यात पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, राज्य परिवहन महामंडळाच्या (पुणे प्रदेश) प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, विभागीय वाहतूक परिवहन अधिकारी अनिल मेहत्तर, कोल्हापूर आरटीओ संजीव भोर, कार्यकारी अभियंता पुणे प्रदेश नागेश कुलकर्णी, विभाग नियंत्रक कोल्हापूर अभय देशमुख, विभागीय अभियंता कोल्हापूर सुरेश मोहिते यांच्यासह स्थानिक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना त्यांनी कोल्हापूर विभागासाठी १२० नवीन बसेस देण्याची घोषणा केली. यासह शासन आणि खाजगी संस्था यांनी एकत्र येऊन (PPP तत्त्वावर) जिल्ह्यातील सहा बसस्थानकांचा विकास केला जाणार आहे. जयसिंगपूर बसस्थानकाच्या पुढील विस्तारीकरणासाठी प्रवाशांच्या सोयीकरिता याच आर्थिक वर्षात निधी उपलब्ध करून देण्याचेही जाहीर केले.
कोल्हापूर विभागात एकूण २३ बस स्थानके आहेत आणि त्यापैकी तब्बल १७ बस स्थानकांचे नूतनीकरण गेल्या दोन वर्षांत पूर्ण झाले. उर्वरित स्थानकांच्या आधुनिकीकरणालाही मंजुरी देण्यात आली आहे. भविष्यात सर्व बसस्थानके नव्याने उभारलेला, अत्याधुनिक कोल्हापूर हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरणार आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
◼️पीपीपी मॉडेल कोल्हापूरमध्ये मध्यवर्ती बसस्थानकावर राबवावे- पालकमंत्री प्रकाश आबिटकर
जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी परिवहन मंत्र्यांच्या कार्यकाळात या विभागासाठी चांगले काम झाल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिक, महिलांना मोफत प्रवास हा चांगला निर्णय असल्याचे सांगितले. कर्मचारी, प्रवासी यांच्याबाबत चांगले निर्णय घेतले. त्यातून राज्यात एसटी फायद्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले. आता पीपीपी मॉडेल कोल्हापूरमध्ये मध्यवर्ती बसस्थानकावर राबवून बदल व्हावा, जिल्ह्याला नवीन गाड्या वाढवून मिळाव्यात, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे प्रश्न सुटावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. तर आमदार चंद्रदीप नरके यांनी ७ एकर जागेत असणाऱ्या संभाजीनगर बस स्थानकावर 117 बसेस ये-जा करतात त्यामुळे या ठिकाणी अधिक महत्व प्राप्त झाले असल्याचे सांगितले.
◼️संभाजीनगर येथील बसस्थानकाचे उपकामासह नवीन बांधकाम अत्याधुनिक संकल्पनेतून पूर्ण
या प्रकल्पास २३ डिसेंबर २०२० रोजी ९ कोटी ८० लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली होती, तर प्रत्यक्ष निविदा रक्कम ७ कोटी २० लाख इतकी आहे. एकूण २८,३०० चौ.मी. जागेपैकी १८१३ चौ.मी. क्षेत्रफळावर हे भव्य बसस्थानक साकारण्यात आले असून, प्रवाशांच्या सुलभतेसाठी येथे एकूण ११ फलाटांची सोय करण्यात आली आहे.
या नूतन बसस्थानकामध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी विविध विभागांची उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये वाहतूक नियंत्रण कक्ष, प्रशस्त प्रवासी प्रतीक्षालाय, स्थानक प्रमुख कार्यालय, पास व आरक्षण कक्ष आणि ४ दुकान गाळ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, मातांसाठी हिरकणी कक्ष आणि गरजूंसाठी स्वस्त दरात औषधे मिळण्यासाठी जनऔषधी केंद्राचीही तरतूद करण्यात आली आहे. त्यासोबतच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलीस चौकी, उपाहारगृह, पार्सल कार्यालय आणि पिण्याच्या पाण्याची दर्जेदार व्यवस्था येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
◼️वाठार आणि पेठवडगाव येथे उत्साहात स्वागत
वाठार बसस्थानक येथे प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर यांनी मंत्री सरनाईक यांचे स्वागत केले. यावेळी आमदार अशोकराव माने, जिल्हा परिषद सभापती शितल यादव, सरपंच सचिन कांबळे यांच्या उपस्थितीत फीत कापून व कोनशिलेचे अनावरण करून बसस्थानकाचे उद्घाटन करण्यात आले. वाठार येथे ४ फलाट आणि ४०५ चौ.मी. क्षेत्रफळाचे आधुनिक केंद्र उभारण्यात आले आहे. त्यानंतर पेठवडगाव बसस्थानकावर नगराध्यक्ष विद्याताई पोळ यांनी मंत्र्यांचे स्वागत केले. १.४४ कोटी रुपये खर्चून साकारलेल्या या स्थानकात ५ सुसज्ज फलाट आणि ४७९ चौ.मी.चे प्रशस्त बांधकाम करण्यात आले असून, यामुळे स्थानिक प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.
◼️जयसिंगपूर बसस्थानकासाठी अतिरिक्त निधीची घोषणा
जयसिंगपूर बसस्थानकाचे उद्घाटन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी आमदार यड्रावकर यांनी मंत्र्यांचे स्वागत केले. नागरिकांशी संवाद साधताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, या भागात विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. जयसिंगपूर बसस्थानकाच्या विस्तारीकरणाची मागणी लक्षात घेता, त्यांनी अतिरिक्त दोन मजल्यांच्या कामाला मंजुरी दिली. तसेच याच वर्षी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल असे आश्वासन दिले. जयसिंगपूरच्या दुसऱ्या टप्प्यातील कामात आता एकूण ८ फलाट, १७ दुकान गाळे आणि पोलीस चौकी अशी अद्ययावत व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य शासन भविष्यातील गरजा ओळखून सर्वच बसस्थानकांचे आधुनिकीकरण करत असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
या कार्यक्रमाला आमदार अशोकराव माने, नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास दादा पाटील, जिल्हा परिषद सभापती श्रद्धाताई गायकवाड यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.