मुंबई: महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्यासाठी राबवलेल्या प्रोत्साहन पर अनुदानापासून कोल्हापूर जिल्ह्यातील ११०२२ शेतकरी वंचित राहिले असून हे अनुदान तात्काळ द्यावे अशी मागणी आमदार पी.एन . पाटील सडोलीकर यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधिमंडळाच्या अधिवेशनात केली. यावरील लेखी उत्तरात राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हे अनुदान देण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला असून लवकरच हे अनुदान दिले जाईल असे लेखी आश्वासन दिले .
राज्य शासनाच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेपासून नियमित कर्ज फेड करणारे अनेक शेतकरी वंचित राहिले होते. या शेतकऱ्यांना शासनाने प्रत्येकी पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान द्यावे; अशी मागणी राज्यात सर्वप्रथम आ . पी .एन . पाटील यांनी केली होती .ही मागणी राज्य शासनाने मान्य करत राज्यात प्रोत्साहन पर अनुदान योजना राबवली आहे .मात्र अद्यापही अनेक शेतकरी वंचित आहेत .
यात कोल्हापूर जिल्ह्यातील ११०२२शेतकऱ्यांचा समावेश असून ४० कोटी रुपयांचे प्रलंबित अनुदान मिळणार की नाही? याबाबत संभ्रमावस्था आहे .राज्यातील जिल्हा बँकांतून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करूनही त्यांना लाभ मिळालेला नाही हे खरे आहे काय? असा प्रश्न करत या शेतकऱ्यांना तात्काळ लाभ देऊन त्यांच्यावर अन्याय दूर करावा असा लेखी तारांकित प्रश्न पाटील यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित केला होता .
त्याच्या लेखी उत्तरात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील विविध बँकांनी नियमितपणे कर्जफेड केलेल्या २८लाख ८४ हजार शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड केलेले आहेत त्यापैकी प्रत्यक्षात १४ लाख१४ हजार खात्यांना ५१३२कोटी रुपयांचे प्रोत्साहन पर अनुदान वर्ग केलेले आहे व उर्वरित अनुदान वर्ग करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे असे उत्तर दिले .कोल्हापूर जिल्ह्यातील वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदानाकडेलक्ष लागलेले आहे . आ .पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे .